अहिल्यानगर जिल्ह्यात संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय स्वागत

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून पूजन ; अमृत उद्योग समूहाकडून वारकऱ्यांसाठी विविध सुविधा

संगमनेर | प्रतिनिधी –

रिमझिम पावसाच्या सरी, हिरवाईने नटलेला परिसर, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात शतकानुशतकांची परंपरा जपणारी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आज अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाली. भक्तिभावाने भारावलेल्या वातावरणात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे पूजन करून वारकरी संप्रदायाचे स्वागत केले.

पारेगाव बु. येथे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या या पालखीसोबत सुमारे २० हजार वारकरी सहभागी झाले होते. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. जयश्री थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डॉ. कुणाल सोनवणे, बी. आर. चकोर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, संपतराव गोडगे, डॉ. दत्तात्रय गडाख, ॲड. त्र्यंबक गडाख, दौलतराव गडाख, सोमनाथ गडाख, दिंडीचे माधव महाराज राठी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या या दिंडीत सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांनी हरिनामाचा अखंड गजर करत अभंगांच्या तालावर जिल्ह्यात प्रवेश केला. लेझीम पथके, पारंपरिक वाद्यांचा निनाद, विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा, स्वागत कमानींनी सजलेला परिसर आणि सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. येथे जात, धर्म, पंथ किंवा भेदभावाला स्थान नाही. पंढरीची वारी ही प्रत्येक शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आनंद, श्रद्धा आणि एकतेचा महोत्सव आहे.”

ते पुढे म्हणाले की, “शांतता, समानता आणि सद्भावनेचे प्रतीक असलेल्या या वारीचे जागतिक स्तरावरही मोठे महत्त्व आहे. ‘माऊली’ या एका शब्दाने लाखो भाविक एकत्र येतात. यंदा राज्यात भरपूर पाऊस पडून शेतकरी, नागरिक आणि सर्व समाज सुखी-समाधानी होवो, अशी प्रार्थना मी विठ्ठल चरणी करतो.”

खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, “नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पालखी स्वागताची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. वारी समतेचा आणि बंधुभावाचा संदेश देणारी आहे. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून जनतेचे जीवन समृद्ध होवो, अशी प्रार्थना आहे.”

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आहे. या वारीत श्रीमंत-गरीब, लहान-मोठा असा कोणताही भेद राहत नाही. मागील वर्षी संगमनेर तालुक्यातील एक हजार युवकांनी दिंडीत सहभाग घेतला होता. यंदाही राज्यात भरपूर पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावेत, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना आहे.”

यावेळी वारकरी महिलांनी फुगड्या खेळत, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग गायन केले. हरिनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

अमृत उद्योग समूहाकडून वारकऱ्यांसाठी सेवाभाव

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अहिल्यानगर जिल्ह्यात स्वागत करण्याची परंपरा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे. यंदाही अमृत उद्योग समूह आणि एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, २५ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक, परिचारिका, चहा-नाश्ता, निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील विविध गावांमध्येही वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येत असून या सेवाभावी उपक्रमाबद्दल वारकरी बांधवांनी बाळासाहेब थोरात आणि अमृत उद्योग समूहाचे आभार व्यक्त केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!