पालखीमार्ग चार दिवसांत डांबरी ; वारकऱ्यांच्या सेवेत आमदार अमोल खताळांचा पुढाकार

पारेगाव खुर्द पालखीमार्गाचे डांबरीकरण पूर्ण 

संगमनेर | प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पारेगाव बुद्रुक येथील अहिल्यानगर–नाशिक जिल्हा सरहद्दीवरील पालखीमार्गाचे रखडलेले डांबरीकरण अवघ्या चार दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि सुलभ होणार आहे अशी माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

पालखी आगमनापूर्वी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी आठ दिवसांपूर्वी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी पालखी आगमनापूर्वी उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या.

आमदार खताळ यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कामाला सुरुवात केली आणि अवघ्या चार दिवसांत डांबरीकरण पूर्ण केले. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खड्डेमुक्त आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून, वारीच्या सेवेसाठी प्रशासनाने वेळेत केलेल्या या कामाचे समाधान व्यक्त केले जात आहे.

डांबरीकरणाचे काम वेळेत पूर्ण झाल्याबद्दल पारेगाव बुद्रुकचे माजी उपसरपंच कैलास गोर्डे, सावित्रा गडाख, रावसाहेब गडाख, बाबासाहेब गोर्डे, सुरेश दळवी, किशोर गडाख, सुनील गडाख, बाळासाहेब गडाख, सुनील वाकचौरे, भीमराज गडाख, निलेश गडाख यांच्यासह ग्रामस्थ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!