‘वाळू-मुरुमावर संसार चालवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये’

सहकार, रेल्वे, पाणी-वीज प्रश्नांवर बाळासाहेब थोरातांचा विरोधकांवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी | संगमनेर

संगमनेरच्या सहकार क्षेत्रासह विकासकामांवर टीका करणाऱ्या विरोधकांचा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी खरपूस समाचार घेतला. तालुक्यातील विविध संस्थांच्या कार्यक्रमांतून बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देत सहकारापासून पाणी, वीज आणि रेल्वेपर्यंतच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली.

सहकारी साखर कारखाना आणि दूध संघावर टीका करणाऱ्यांना सुनावताना थोरात म्हणाले, “ज्यांचे कारखान्याला उसाचे एक टिपूर जात नाही, दूध संघात एक लिटर दूध जात नाही आणि जे सभासदही नाहीत, ते आम्हाला सहकार कसा चालवायचा याचे धडे देत आहेत.”

विरोधकांच्या नैतिकतेवरही त्यांनी थेट प्रहार केला. “वाळू-मुरुमाच्या बेकायदेशीर तस्करीवर संसार चालवणाऱ्यांनी आम्हाला नीतिमत्तेचे धडे देऊ नयेत,” असा घणाघात त्यांनी केला. शेजारील तालुक्यांतील कारभारावर बोलण्याची काहींची हिंमत नसते, कारण त्यांचे ‘दाणापाणी’ बंद होण्याची भीती असते, असा आरोपही त्यांनी केला.

‘लोकप्रतिनिधी रिमोट कंट्रोलवर’

लोकप्रतिनिधींवर निशाणा साधताना थोरात यांनी ते दुसऱ्याच कोणाच्या तरी ‘रिमोट कंट्रोल’वर काम करत असल्याचा आरोप केला. “पाणी, वीज आणि रेल्वेसारखे मूलभूत प्रश्न गंभीर असताना लोकप्रतिनिधींनी त्यावर आवाज उठवला पाहिजे. मात्र, वाळू-मुरुमाच्या पुढे त्यांचा विचार जात नाही,” अशी टीका त्यांनी केली.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या संगमनेरमार्गे प्रस्तावित मार्गाबाबतही थोरात आक्रमक झाले. “संगमनेरला रेल्वे येऊ नये म्हणून कोणीतरी चांगल्या प्रकल्पाच्या कामात खुट्ट्या घातल्या आणि रेल्वे पळवण्याचा उद्योग केला,” असा आरोप त्यांनी केला.

संगमनेरच्या हक्काच्या पाणी आणि वीज प्रश्नावरही त्यांनी संघर्षाचा इशारा दिला. लोड शेडिंग करून पाणी पळवण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. पाण्याचा योग्य वाटा तालुक्याला मिळावा, तसेच वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर ठोस उपाय व्हावा, यासाठी आगामी काळात जनआंदोलन उभारण्याचे संकेत त्यांनी दिले.

“संगमनेरचा स्वाभिमान आणि विकास वाचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तालुक्याच्या हक्कासाठी कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही,” असा निर्धार थोरात यांनी व्यक्त केला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!