पोलीस अंमलदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाखांची मागणी ; १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

हॉटेलवर काम करणाऱ्या नोकराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याच्याकडून ५ लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर १ लाख रुपये लाच स्वीकारताना पाथर्डी पोलीस ठाण्यातील लोकसेवक पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पथकाने रंगेहात पकडले. 

तक्रारदार यांच्या हॉटेलवर काम करणारा नोकर मोटारसायकलवरून पाथर्डी गावातून जात असताना त्याच्या एका अनोळखी ट्रकचालकासोबत गाडीला कट मारल्याच्या कारणावरून भांडण होऊन आपापसात मारामारी झाली होती. या घटनेनंतर लोकसेवक विनोद मासाळकर यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या हॉटेलवर काम करणाऱ्या नोकराविरुद्ध हाफमर्ड व रॉबरी या गुन्ह्याचा दाखल करण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. तसेच, हा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. 

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार दिली. तक्रारीच्या पडताळणीदरम्यान लोकसेवक विनोद मासाळकर यांनी तक्रारदार यांच्या नोकराविरुद्ध हाफमर्ड व रॉबरीचा गुन्हा दाखल न करता सौम्य स्वरूपाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर जामीन मंजूर करून तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात तडजोडीनंतर २ लाख रुपयांची लाच मागितली.

यानंतर १ लाखावर तडजोड झाली. त्यानुसार १९ सप्टेंबर २०२६ रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन बाजूच्या पानाच्या टपरीजवळ तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विनोद मासाळकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७ अन्वये पाथर्डी पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संतोष पेलकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोहेवा/२५३८ विनेश शेरणार, पोहेवा/२३५७ अनिलनाथ पवार आणि पो.कॉ./१०६६ योगेश शिंदे यांचा समावेश होता.

तपास अधिकारी म्हणून श्रीमती सविता तांबे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!