घारगाव हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई ; 

५ लाखांच्या स्कॉर्पिओसह ३८ हजार रुपयांची दारू जप्त

संगमनेर | प्रतिनिधी

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार आणि ३२ हजार रुपयांची विविध प्रकारची देशी-विदेशी दारू, असा एकूण ५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने येणारी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार बोटा गावातून अकोलेच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर बोगदाजवळ साईड रोडला जाऊन थांबले.

दरम्यान, दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून संगमनेरकडे एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने कार रस्त्याच्या बाजूला थांबवली. कारची झडती घेतल्यानंतर चालकाची चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव दौलत साहेबराव महाले (वय ३२ वर्षे, रा. बेलापूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.

यावेळी पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये पुढील दारूसाठा आढळून आला—

1. इम्पीरियल ब्ल्यू कंपनीच्या १८० मिलीच्या ५ सीलबंद बाटल्या — किंमत ₹१,०००

2. Derby Special कंपनीच्या १८० मिलीच्या ५ सीलबंद बाटल्या — किंमत ₹७५०

3. क्लासिक गोल्ड कंपनीच्या १८० मिलीच्या ४० सीलबंद बाटल्या — किंमत ₹६,०००

4. ब्राऊन मॅन कंपनीच्या १८० मिलीच्या ४० सीलबंद बाटल्या — किंमत ₹६,०००

5. रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मिलीच्या २५ सीलबंद बाटल्या — किंमत ₹६,२५०

6. देशी जी.एम. कंपनीच्या ९० मिलीच्या ३०० सीलबंद बाटल्या — किंमत ₹१२,०००

7. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार, क्रमांक एम.एच. १४ सी.सी. ४६०२ — किंमत ५ लाख रुपये 

असा एकूण ५,३२,००० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सदर दारूचा माल कोठून आणला याबाबत चालक दौलत साहेबराव महाले याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने सदर दारूचा माल हेरिटेज वाईन्स, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे येथून घेतल्याचे सांगितले. तसेच सदर कारचे कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता, ही कार सोपान बाळाजी गागरे, रा. बेलापूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर यांची असल्याचे त्याने सांगितले.

याप्रकरणी आरोपी दौलत साहेबराव महाले याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबिशन ॲक्ट कलम ६५(अ), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, घारगाव पोलीस स्टेशन, पोकॉ प्रमोद गाडेकर, पोकॉ सुभाष बोडखे, नेम. घारगाव पोलीस स्टेशन व पोहेकॉ सचिन धनाड, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर यांनी केली. पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करीत आहे. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!