जनतेच्या न्यायालयात माझा विजय आधीच ; विरोधक स्वप्नरंजन करतायत ! : आमदार अमोल खताळांचा घणाघात
“विकासाची वाटचाल आता कोणालाही थांबवता येणार नाही”
संगमनेर | प्रतिनिधी
“जनतेच्या न्यायालयात माझा विजय आधीच झालेला आहे. न्यायालयाने केवळ याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे. मात्र काही जणांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून पुन्हा मुख्यमंत्री किंवा आमदार होण्याची स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली आहे,” अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महा महसूल समाधान शिबिरात’ बोलताना आमदार खताळ यांनी विकासकामांचा आढावा घेत विरोधकांवर सडकून टीका केली.

“माझ्यासारख्या ४२ वर्षांच्या युवकाने त्यांचा पराभव केला. तो पराभव त्यांना आजही पचत नाही. त्यामुळे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मात्र संगमनेरची सामान्य जनता माझ्यासोबत असल्याने मला कोणाचीही चिंता नाही,” असे ते म्हणाले.
“जोपर्यंत माझ्या पाठीशी सामान्य जनता आहे, तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. जनतेच्या विश्वासाच्या बळावर सुरू झालेली विकासाची वाटचाल आता कोणालाही थांबवता येणार नाही,” असा ठाम इशारा देत त्यांनी विरोधकांवर पुन्हा निशाणा साधला.

संगमनेरमध्ये आता नागरिकांची कामे वेळेत होत असून, पूर्वी काही मोजक्या लोकांनी सरकारी कार्यालयांवर मक्तेदारी निर्माण केली होती. मात्र आता अधिकारी निर्भयपणे काम करत असून सर्वसामान्य नागरिकांनाही सन्मानाची वागणूक मिळत असल्याचा दावा आमदार खताळ यांनी केला.
तालुक्यातील १४ महसूल मंडळांमध्ये विशेष अभियान राबवून १,७९७ फेरफार प्रकरणे निकाली, ३८० सातबारा दुरुस्त्या, ४,५०० डिजिटल सातबारे, १,७०० महसूल प्रमाणपत्रांचे वितरण तसेच एक खिडकी योजनेतील १,०७० अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कौठे-मलकापूर परिसरातील एमआयडीसी अंतिम टप्प्यात असून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक–पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले.

तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी भोजापूर धरण, सिंचन योजना आणि कालव्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी अरुण मुंडे यांनी सांगितले की, तालुक्यातील १४ महसूल मंडळांमध्ये आयोजित समाधान शिबिरांमधून सुमारे १० हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महसूल मंडळात शिबिरे घेऊन महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी अरुण मुंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, विविध विभागांचे अधिकारी तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
