शासकीय साहित्यावर फोटो लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न — संजय कोल्हे यांचा आरोप
यशोधन कार्यालयातून १८ हजार असंघटित कामगारांची नोंदणी
संगमनेर | प्रतिनिधी –
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयामार्फत असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी राबविण्यात आलेल्या सेवा उपक्रमातून आतापर्यंत १८ हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली असून, मागील एका वर्षात शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २ कोटी २० लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती देतानाच काही जण मात्र शासकीय साहित्यावर फोटो लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते म्हणाले की, मागील काही वर्षांपासून यशोधन कार्यालयामार्फत तालुक्यातील पात्र असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र सेवा कक्ष कार्यरत आहे. जनसेवकांनी गावागावांत जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित केली, ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली आणि हजारो कामगारांना विविध योजनांशी जोडले.
आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक पात्र कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अपघातात जखमी अथवा मृत झालेल्या ११ कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. तसेच नोंदणीकृत कामगारांना गृहउपयोगी साहित्य, शिष्यवृत्ती व इतर कल्याणकारी योजनांचाही लाभ मिळत असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.
यशोधन कार्यालयातून नोंदणी झालेल्या कामगारांनाच घरगुती भांडी व साहित्याचा लाभ मिळत असल्याचा दावा करत त्यांनी काही नवीन लोकप्रतिनिधी व व्यक्तींकडून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. प्रत्यक्ष नोंदणी किंवा योजना राबविण्यात कोणतेही योगदान नसताना साहित्य वितरणाच्या कार्यक्रमांतून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कामगार कल्याण आयुक्तालयाने ज्या कार्यालयांमार्फत किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नोंदणी झाली, त्यांच्यामार्फतच साहित्याचे वितरण व्हावे, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी यापूर्वी केली होती. मात्र, संगमनेर तालुक्यात साहित्यावर फोटो लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे दुर्दैवी असल्याची टीकाही संजय कोल्हे यांनी केली.
यशोधन कार्यालयातून मोफत नोंदणी ; एजंटगिरीला बसला आळा
यशोधन कार्यालयामार्फत असंघटित, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी पूर्णपणे मोफत नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. अनेक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करण्यात आली. या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला. यशोधन कार्यालयातून सेवा उपलब्ध झाल्याने खाजगी एजंटांची एजंटगिरी बंद झाली असून, कोणीही पैशांची मागणी केल्यास तातडीने यशोधन कार्यालय किंवा शासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
