“आमच्या चार पिढ्यांनी लोकशाही जपली, ‘विधिमंडळाचा अपमान करणे आमच्या रक्तात नाही !’ – दुर्गाताई तांबे यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
संगमनेर प्रतिनिधी –
“मी स्वातंत्र्यसेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांची कन्या आहे. आमच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवली असून, लोकांनी दिलेल्या जबाबदारीचा नेहमीच सन्मान केला आहे. अशा कुटुंबातील व्यक्ती विधिमंडळाचा अपमान करेल, असा आरोप करणे केवळ चुकीचेच नाही तर अत्यंत वेदनादायी आहे,” अशा शब्दांत संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी विरोधकांच्या आरोपांचा तीव्र समाचार घेतला आहे. आपल्या अधिकृत भूमिकेद्वारे त्यांनी चुकीचा अर्थ काढून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

दुर्गाताई तांबे यांनी आपल्या राजकीय आणि कौटुंबिक संस्कारांची पाळेमुळे अधोरेखित करताना म्हटले की, “मी स्वतः लोकांनी निवडून दिलेली संगमनेर शहराची नगराध्यक्षा म्हणून तब्बल साडेबारा वर्षे काम केले आहे, सभागृह चालवले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहाची प्रतिष्ठा, मर्यादा आणि परंपरा जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत.”
आपल्या कुटुंबाचा लोकशाहीतील वाटा स्पष्ट करताना त्या म्हणायल्या, “माझे वडील स्व. भाऊसाहेब थोरात यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, लोकशाहीची पायाभरणी केली. त्यांनी सहकार क्षेत्रासह महाराष्ट्राच्या विधानसभेतही काम केले. माझे बंधू बाळासाहेब थोरात यांनी तब्बल ४० वर्षे विधिमंडळात जनतेचा आवाज मांडला, तर पती डॉ. सुधीर तांबे यांनी १४ वर्षे विधानपरिषदेत काम केले. आज माझा मुलगा सत्यजीत तांबे देखील याच विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडत आहे. ज्या कुटुंबाने आयुष्यभर लोकशाहीचा आदर केला, त्यांच्यावर असे बिनबुडाचे आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे.”

विरोधकांना लोकशाहीच्या मूल्यांची आठवण करून देताना दुर्गाताई म्हणाल्या, “विरोध करा, टीका करा, विचारांची लढाई लढा हीच तर लोकशाहीची सुंदरता आहे. पण खोटा अर्थ काढून, जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीची परंपरा नाही. माझ्या रक्तात आणि संस्कारात संसदीय सभागृहांचा सन्मान आहे. विधिमंडळ माझ्यासाठी कालही पवित्र होते, आजही पवित्र आहे आणि उद्याही पवित्रच राहील.”
शेवटी, “बाकी कसलेही भान नसलेल्या आणि केवळ राजकारणासाठी टीका करणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही,” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे.
