माजी नगराध्यक्षा अंजली तांबे यांच्याविरोधात हक्कभंगाची आमदार अमोल खताळ यांची मागणी

प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याची मागणी

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंजली सुधीर तांबे यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र विधानसभेचा उल्लेख “अपवित्र विधानसभा” असा केल्याचा मुद्दा शुक्रवारी राज्य विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार अमोल खताळ यांनी हे वक्तव्य विधानसभेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असल्याचा दावा करत संबंधितांविरुद्ध हक्कभंगाची कारवाई करून प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

सभागृहात मांडलेल्या निवेदनात आमदार खताळ यांनी म्हटले की, संबंधित वक्तव्य हे केवळ एखाद्या सदस्याविरुद्ध किंवा राजकीय पक्षाविरुद्ध नसून संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेच्या संस्थात्मक प्रतिष्ठेवर आघात करणारे आहे. महाराष्ट्र विधानसभा ही जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे सर्वोच्च व्यासपीठ असून, याच सभागृहात जनतेचे प्रश्न मांडले जातात, कायदे केले जातात आणि शासनाला उत्तरदायी धरण्याचे घटनात्मक कार्य पार पाडले जाते, असे त्यांनी नमूद केले.

यामुळे विधानसभेला “अपवित्र” संबोधणे म्हणजे केवळ सभागृहाचाच नव्हे, तर राज्यातील मतदारांच्या जनादेशाचाही अवमान असल्याचे खताळ यांनी सांगितले. लोकशाही व्यवस्थेत मतभेद आणि टीका स्वाभाविक असली, तरी संपूर्ण विधानसभेची प्रतिष्ठा कमी करणारी भाषा वापरणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारच्या विधानांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यातही विधानसभेबाबत अवमानकारक वक्तव्यांना प्रोत्साहन मिळू शकते, अशी चिंता व्यक्त करत सभागृहाची प्रतिष्ठा, अधिकार आणि परंपरा अबाधित राखणे ही प्रत्येक सदस्याची जबाबदारी असल्याचे खताळ यांनी सांगितले.

या प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध हक्कभंगाची कार्यवाही सुरू करावी, तसेच प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवून आवश्यक चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!