ऑपरेशन शोध : अहिल्यानगर पोलिसांचे मोठे यश

९८ बेपत्ता बालकांचा लावला शोध

 अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी राज्यस्तरीय ‘ऑपरेशन शोध–IV’ मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत ९८ बेपत्ता बालकांचा यशस्वी शोध लावला आहे. शोधण्यात आलेल्या सर्व बालकांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, मुंबई यांच्या सूचनेनुसार दि. ८ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, विशेष पथके तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे पार पडली. मोहिमेदरम्यान एकूण ९८ बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात आला असून त्यामध्ये ९० मुली आणि ८ मुलांचा समावेश आहे.

या मोहिमेसाठी प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) कार्यालय व पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली होती. गोपनीय माहिती संकलन, व्यावसायिक तपास कौशल्य तसेच इतर जिल्ह्यांशी प्रभावी समन्वय यांच्या बळावर ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

पोलीस प्रशासनाने भविष्यातही हरवलेल्या व अपहरण झालेल्या बालकांच्या शोधासाठी अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी हरवलेल्या बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ही मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU), अहिल्यानगर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या राबविली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!