“मिसिंग लिंकवर उत्तर देताना विवेक ‘मिसिंग’ होता” — प्रा. सुषमा अंधारे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुले पत्र
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्या, अपमानास्पद भाषा टाळा ; मुख्यमंत्र्यांवर टीका
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
मिसिंग लिंक प्रकल्पावरून राज्याचे राजकारण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून त्यांच्या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभेतील भाषणाचा संदर्भ देत अंधारे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, पेपरफुटी, महिला सुरक्षा, आझाद मैदानावरील आंदोलने यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून सविस्तर भूमिका अपेक्षित होती. मात्र, चर्चेचा केंद्रबिंदू मिसिंग लिंक प्रकल्प आणि विरोधकांवरील टीका हा राहिला.

अंधारे यांनी आरोप केला की, “मिसिंग लिंकवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणून अपेक्षित असणारा विवेक मात्र मिसिंग होता.” विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना “कुत्रे”, “भाड्याचे टट्टू” यांसारख्या शब्दांचा वापर करणे हे संसदीय परंपरेला अशोभनीय असल्याचे त्यांनी म्हटले.
“प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही”
अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांसह विविध घटकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारला जबाबदारीने द्यावी लागतात. जनतेच्या पैशातून उभ्या राहिलेल्या प्रकल्पाबाबत प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा भाग आहे.
“मिसिंग लिंकसाठी खर्च झालेले हजारो कोटी रुपये हे जनतेच्या करातून आलेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत किंवा गुणवत्तेबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही” — जुन्या वक्तव्याची आठवण
अंधारे यांनी 2022 मधील फडणवीस यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या काळातील विधानाचा उल्लेख करत म्हटले की, “सत्ताधाऱ्यांनी हा गैरसमज काढून टाकावा की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात,” असे आपणच म्हटले होते. आता तोच नियम सत्तेत असताना लागू होत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा
पत्रातून अंधारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय, परीक्षा पेपरफुटी, महिला सुरक्षेचे प्रश्न, अमली पदार्थांचे वाढते प्रमाण, राज्याबाहेर गेलेले उद्योग प्रकल्प आणि मराठी माणसांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांचा उल्लेख केला.
“महाराष्ट्राचा अपमान कुठे होतो यावर आवाज उठवण्याची गरज असताना आपण शांत राहिलात; मात्र प्रश्न विचारले जात असताना महाराष्ट्र धर्माचा आधार घेतला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.

“आत्ममुग्धतेपासून सावध राहा”
मुख्यमंत्र्यांना उद्देशून अंधारे यांनी “दिवसेंदिवस आपण आत्ममुग्धतेच्या (नार्सिसिझम) विकाराचे बळी ठरत आहात का?” असा सवाल केला. विरोधकांचा आवाज, टीका आणि प्रश्न हे लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
पत्राच्या शेवटी अंधारे यांनी म्हटले की, सभागृहात वापरलेल्या भाषेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला आहे. “एकांतात आरशासमोर उभे राहिल्यावर अंतर्मन हे मान्य करेल की आज सभागृहात महाराष्ट्राचा अपमान झाला,” असा टोला त्यांनी लगावला.
