शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ ? कर्जमाफी समितीची बैठक रद्द ; शेतकरी नेत्यांचा सरकारवर तीव्र आरोप
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
विनाअट सरसकट कर्जमाफीच्या मागणीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत होणारी नियोजित बैठक ऐनवेळी रद्द झाल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. या घटनेमुळे शेतकरी प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सरकारने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, नियोजित वेळेनुसार शिष्टमंडळ बैठकीसाठी उपस्थित होते. मात्र, संबंधित अधिकारी बैठकीसाठी उपस्थित नसल्याचे आढळून आले. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर बैठक रद्द झाल्याची माहिती दूरध्वनीद्वारे देण्यात आल्याचा दावा प्रतिनिधींनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत, “शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचे या घटनेतून दिसून येते,” असा आरोप केला. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमागे सरकारचा निर्देश असल्याचाही आरोप त्यांनी केला.
बैठक रद्द होणे हा केवळ शिष्टमंडळाचा नव्हे, तर राज्यातील शेतकरी वर्गाचा अवमान असल्याचा दावा करत, सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. आगामी काळात राज्यभर जनजागृती आणि आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
सरकारची अधिकृत भूमिका अद्याप आमच्यापर्यंत आलेली नाही. ती उपलब्ध झाल्यानंतर संबंधित बाजूही प्रसिद्ध करण्यात येईल.
