पाथर्डीतील दरोड्याचा छडा ! 

स्थानिक गुन्हे शाखेकडून आंतरजिल्हा टोळी गजाआड ; जबरी चोरी, घरफोडीचे १२ गुन्हे उघड

चोरीचे सोने घेणारा सोनारही अटकेत 

अहिल्यानगर प्रतिनिधी –

किर्तनवाडी (ता. पाथर्डी) येथे घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत लाखोंचा मुद्देमाल लुटणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २ मुख्य आरोपींसह चोरीचा माल घेणाऱ्या सोनाराला अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १२ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे पाथर्डी आणि शेवगाव परिसरात धुमाकूळ घालणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड झाली आहे.

१० जून २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास किर्तनवाडी येथील रहिवासी रावसाहेब बाजीराव किर्तने व त्यांची पत्नी घरात झोपलेले असताना ७ अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी किर्तने दाम्पत्याला व साक्षीदारांना बेदम मारहाण करत घरातून ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचा आणि शेजारील साक्षीदाराच्या घरातून १ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज, असा एकूण ४ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१०(२) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ सपोनि हरीश भोये, पोउपनि अनंत सालगुडे आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून रवाना केले.

७ जुलै २०२६ रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, या दरोड्यातील मुख्य आरोपी राम कृष्णा चव्हाण (रा. चकलांबा, जि. बीड) आणि करण भोसले (रा. सारोळा कासार, जि. अहिल्यानगर) हे त्यांच्या इतर साथीदारांसह टाकळी मानूर शिवारात दबा धरून बसले आहेत. पोलिसांनी वेळ न घालवता टाकळी मानूर शिवारात सापळा रचला आणि संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी किर्तनवाडी येथील दरोड्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात त्यांचे इतर साथीदार:

 * राहुल रज्जाक काळे (रा. टाकळी मानूर, पाथर्डी)

 * आदिशोक चंद्रभान चव्हाण, हनुमान कृष्णा चव्हाण, लक्ष्मण कृष्णा चव्हाण, कडूबा ढोणे (सर्व रा. गेवराई, जि. बीड)

 * सागर नाबद चव्हाण (रा. टाकळी मानूर)

 * विकास विठ्ठल भोसले (रा. उमापूर, जि. बीड)

यांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे कबूल केले. सध्या हे ७ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच, चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या ओमकार पांडुरंग दहीवाळ (वय २५, रा. चकलांबा, जि. बीड) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी तपासली असता, त्यांनी अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात चोरीचा सुळसुळाट केल्याचे समोर आले.

खालील ११ अतिरिक्त गुन्हे उघड झाले आहेत:

शेवगाव पोलीस ठाणे – २ गुन्हे (बी.एन.एस. कलम ३०९ अंतर्गत चोरी व जबरी चोरी)

 पाथर्डी पोलीस ठाणे – ९ गुन्हे (बी.एन.एस. कलम ३३१(४), ३०५, ३०९ अंतर्गत घरफोडी व रात्रीची चोरी)

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, फुरकान शेख, भिमराज खर्से, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे, मनोज साखरे, सागर ससाणे, प्रशांत राठोड, चालक भगवान धुळे व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!