प्रवरा नदीपात्रातून वाळू तस्करी करणाऱ्यांना पकडले ! 

एकास अटक, दोघे जण पसार  

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत नेवाशातील प्रवरा नदीपात्रात सुरू असलेली वाळू तस्करी पकडली आहे. या धाडीत 13 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ७ जुलैच्या रात्री नेवासा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागील प्रवरा नदीपात्रात छापा टाकण्यात आला.

छाप्यादरम्यान एक डंपर आणि टेम्पोमध्ये अवैधरित्या वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी वाहनांसह पळण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून ज्ञानेश्वर गोरख बर्डे (वय ४२, रा. खालाल पिंपरी, ता. नेवासा) याला ताब्यात घेतले. तर टेम्पो मालक रामकृष्ण नवनाथ आळकुटे (रा. गंगानगर, नेवासा) आणि टेम्पो चालक फरार झाले.

कारवाईत २ ब्रास वाळू (₹२० हजार), एक डंपर (₹८ लाख) आणि एक टेम्पो (₹५ लाख) असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!