अहिल्यानगर जिल्हा पोलिसांची गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम ; ६८ सराईत गुन्हेगार तडीपार
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती
श्रीरामपूर | प्रतिनिधी –
सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ (Zero Tolerance) धोरण अवलंबले असून, सन २०२५ व २०२६ या कालावधीत श्रीरामपूर विभागातील एकूण ६८ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार सक्रिय गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाया सुरू असून, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५५ व ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेविरुद्ध तसेच शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे सातत्याने करणाऱ्या आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींना विविध कालावधीसाठी संबंधित क्षेत्रांतून तडीपार करण्यात आले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये श्रीरामपूर शहर, राहुरी, नेवासा, सोनई, कोपरगाव शहर, राहाता, शिर्डी, संगमनेर, घारगाव आणि अकोले पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. काही आरोपींना सहा महिने, एक वर्ष तर काहींना दोन वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित जिल्हे व तालुक्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.
यामध्ये संगमनेर तालुक्यातील राजेंद्र तुकाराम सानप (सोनोशी), संगमनेर शहरातील राजिक रज्जाक शेख (मदीनानगर) तसेच घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश बबन कुरकुटे यांच्यासह अकोले तालुक्यातील अनेक आरोपींचाही समावेश आहे.
याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत काही गुन्हेगारी टोळ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर, राहुरी, लोणी आणि कोपरगाव परिसरातील टोळ्यांतील सदस्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीसांनी स्पष्ट केले आहे की, तडीपार आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
हद्दपार कालावधीत अत्यावश्यक कारणास्तव संबंधित व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय संबंधित क्षेत्रात आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, तडीपार करण्यात आलेल्या व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात वावरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात, संबंधित पोलीस निरीक्षकांकडे किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०२४१-२४१६१३२ / ०२४१-२४१६१३८ या क्रमांकांवर माहिती देण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले आहे.
