जेलमधून सुटल्यानंतर विनापरवाना रॅली ; सराईत गुन्हेगार ‘भोऱ्या’ पुन्हा जेरबंद

खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपीवर एमआयडीसी पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | प्रतिनिधी –  

अहिल्यानगर जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर विनापरवाना मोटारसायकल रॅली काढून परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (वय १९, रा. बोल्हेगाव फाटा, ता. जि. अहिल्यानगर) याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी भोऱ्या हा जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह आणि १० ते १५ जणांच्या समूहासोबत जिल्हा कारागृह ते नागापूर एमआयडीसी परिसरापर्यंत मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीदरम्यान घोषणाबाजी, आरडाओरड करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी संबंधित रॅली विनापरवाना काढण्यात आल्याचे तसेच सरकारी आदेशांचे उल्लंघन करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याचे निदर्शनास आणले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५२६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, भोऱ्या उर्फ विठ्ठल काळे याच्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, धमकी आदी गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे एमआयडीसी, नगर तालुका व सुपा पोलीस ठाण्यांमध्ये नोंद आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली सफौ. राकेश खेडकर, पोहेकॉ. राजू सुद्रीक, शैलेश रोहोकले, संदीप पवार, गणेश चौधरी, किशोर जाधव, दहिफळे, दीपक फुंदे आदींच्या पथकाने केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!