जामखेड येथील शासकीय निवासी शाळेचे लोखंडी गेट तोडल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जामखेड येथील आरोळेनगर परिसरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेच्या आवारात नुकतेच बसविण्यात आलेले लोखंडी प्रवेशद्वार अज्ञात व्यक्तींनी तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २ जुलै रोजी शाळेच्या पूर्व बाजूस लोखंडी गेट बसविण्यात आले होते. मात्र त्याच रात्री अज्ञात व्यक्तींनी गेटचे कुलूप तोडून गेट बाजूला ढकलले. या घटनेत सुमारे ५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर मुख्याध्यापक राहुल दळवी यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संजय लोखंडे करीत आहेत.
सदर शासकीय परिसरात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. संबंधित विभागाच्या नोंदीनुसार, परिसरात काही स्थानिकांकडून अनधिकृत ये-जा, वाहनतळाचा वापर, कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे, संरक्षक भिंतीचे नुकसान करणे तसेच शासकीय मालमत्तेची हानी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच अशा प्रकारांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याच्या घटनाही प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर परिसरात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविणे, अनधिकृत वावरास प्रतिबंध करणे तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच या प्रकरणात सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
