गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी अटकेत — LCB ची कारवाई 

संगमनेर टाइम्स | अहिल्यानगर 

घोडेगाव (ता. नेवासा) येथे झालेल्या गोळीबारातून झालेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी महत्त्वाची कारवाई करत फरार असलेल्या आणखी एका आरोपीला पुणे जिल्ह्यातील वाकड येथून ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी गणेश कारभारी साबळे (वय ३७, रा. पानसवाडी, ता. नेवासा) हा फुलमाळी टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडेगाव येथील जनावरांच्या करपावतीच्या लिलावाच्या वादातून हे वैमनस्य निर्माण झाले होते. याच वादाच्या पार्श्वभूमीवर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नितीन विलास शिरसाठ यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी गुलाब सादिक फुलमाळी, सूरज फुलमाळी आणि आकाश आण्णा फुलमाळी या तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र गणेश कारभारी साबळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सात दिवस आरोपीचा माग काढला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वाकड (जि. पुणे) येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने साथीदारांसह गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा आरोपी कृष्णा फुलमाळी टोळीशी संबंधित असून त्या टोळीविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

अटक केलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!