वाळूच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात, दोघे फरार

संगमनेर टाइम्स | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चापडगाव शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दोन जण फरार आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाईसाठी गस्त घालत होते.

3 जुलै 2026 रोजी रात्री गुप्त माहितीच्या आधारे चापडगाव ते करमाळा मार्गावरील पुलाजवळ सापळा रचण्यात आला. त्यावेळी वाळूने भरलेला टाटा कंपनीचा हायवा अडवून त्याची तपासणी करण्यात आली.

चालक संकेत सुनिल होगले (वय 21, रा. घारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत संबंधित हायवा बाबासाहेब घोडके (रा. कर्जत रोड, करमाळा) आणि अविनाश उर्फ दादा निंभोरे (रा. नागापूर, ता. कर्जत) यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली. दोन्ही संशयित सध्या फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

या कारवाईत 4 ब्रास वाळू (किंमत 40 हजार रुपये) आणि 25 लाख रुपयांचा टाटा हायवा असा एकूण 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भिमराज खर्से, किशोर शिरसाठ, अमोल कोतकर आणि भाऊसाहेब काळे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!