वाळू तस्करावर गुन्हे शाखेची कारवाई
ट्रॅक्टर आणि मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाणी नदीपात्रातून वाळूची चोरी करून वाहतूक करणाऱ्या एका वाळू तस्कराला रंगेहात पकडले. या कारवाईत विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि चोरीची वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये आणि त्यांच्या पथकाकडून शेवगाव परिसरात गस्त सुरू होती. याच दरम्यान लाडेवस्तीजवळील नाणी नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पथकाने शेवगाव–लाडेवस्ती रस्त्यावरील चौफुली येथे सापळा रचला.

काही वेळातच संशयास्पद ट्रॅक्टर येताना दिसताच पोलिसांनी तो अडवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव कृष्णा दगडू धनवडे (वय ३०, रा. शेवगाव) असे सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून विना क्रमांकाचा स्वराज ७४४ ट्रॅक्टर (किंमत ५ लाख रुपये) तसेच १ ब्रास चोरीची वाळू (किंमत १० हजार रुपये) असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपी कृष्णा धनवडे याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ तसेच महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांच्या पथकाने केली.

