‘मुरूम’ वादातून थेट गोळीबार ! तलवारीसह घातला धुडगूस

घराची तोडफोड, शिवीगाळ व दमदाटी

संगमनेर तालुक्यातील थरारक घटना ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यात मुरूम वाहतुकीच्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरासमोर येत आरोपींनी थेट पिस्तूलातून गोळीबार करून फिर्यादीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप असून, त्यानंतर तलवारीने घरावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी संदीप घुगे (राहणार मालुंजे तालुका संगमनेर) हे त्यांच्या राहत्या घरी असताना दोन मोटारसायकलींवर आरोपी आले. विशाल होशीराम खेमनर (रा. अंभोरे) व प्रविण ठकाजी पुणेकर (रा. डिग्रस) यांनी हातातील पिस्तूलातून फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात फिर्यादी बचावले.

यानंतर सुदर्शन शिवाजी श्रीराम व त्याच्यासोबतच्या अन्य तीन अनोळखी साथीदारांनी तलवारीने घराच्या दरवाजा व खिडक्यांवर वार करून तोडफोड केली. आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शस्त्रांचा वापर करून हल्ला, घराची तोडफोड, धमकी व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!