दरोडेखोर पकडला ! सात साथीदार फरार !!

५ गंभीर गुन्हे उघड ; गावठी कट्टा, क्रेटा कारसह ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, या टोळीशी संबंधित दरोडा व जबरी चोरीचे तब्बल ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. कारवाईदरम्यान गावठी कट्टा, हुंदाई क्रेटा कारसह ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१४ मार्च २०२६ रोजी वालवड (ता. कर्जत) येथे बंडू रामदास पांडुळे यांच्या घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ६१ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे प्रविण उर्फ पप्पू लाला भोसले (रा. बाभुळगाव, ता. कर्जत) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली. या प्रकरणातील सात आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

चौकशीदरम्यान आरोपींकडून मिरजगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले दरोडा व जबरी चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले. चोरीतील दागिने पुणे जिल्ह्यातील एका व्यक्तीकडे दिल्याची माहितीही आरोपीने पोलिसांना दिली आहे.

कारवाईत आरोपीच्या ताब्यातून ३० हजार रुपयांचा गावठी कट्टा आणि ८ लाख रुपयांची हुंदाई क्रेटा कार असा एकूण ८.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, पुढील तपास मिरजगाव पोलीस ठाणे करत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!