वाळू माफियांवर दोन ठिकाणी धाड !
३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अवैध वाळू तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत कोपरगाव शहर व पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून ३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३० जून रोजी ही धडक कारवाई केली.
➡️ कोपरगाव शहर : ४ ब्रास अवैध वाळूसह २७ लाख ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींविरुद्ध गुन्हा.
➡️ पारनेर : २ ब्रास अवैध वाळूसह ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, १ आरोपीविरुद्ध गुन्हा.
एकूण ६ ब्रास अवैध वाळू, वाहतुकीसाठी वापरलेली वाहने आणि इतर साहित्य असा ३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीसांनी स्पष्ट इशारा दिला असून अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील धडक मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
