संगमनेरात कत्तलखान्यावर छापा ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीची कारवाई संगमनेर पोलीस मात्र निवांत 

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी कडून कत्तलखान्यांवर सलग मोठमोठ्या कारवाया सुरू आहेत. छापे टाकण्यात येत असून आरोपींना अटक करण्यात येत आहे. मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. हे सर्व होत असताना या अवैध कत्तल खाण्यावर संगमनेर शहर पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. संगमनेर पोलीस निवांत असल्याचे बोलले जाते.

शहरातील अवैध गोमांस व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे मोठा घाव घालत धडक कारवाई केली. सुकेवाडी रोड, श्रमिकनगर परिसरात टाकलेल्या छाप्यात २ हजार किलो गोमांस आणि महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. सुकेवाडी रोडवरील जिजामाता इंग्लिश स्कूलजवळ एका पिकअप वाहनातून गोमांस विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

छापा पडताच संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. चौकशीत फरार आरोपींची नावे रेहान उर्फ जादू गुलाबनबी कुरेशी (रा. अलकानगर, संगमनेर) आणि काशीब असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) अशी समोर आली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचे २ हजार किलो गोमांस आणि ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!