‘नोटीसांकडे दुर्लक्ष महागात !’

घासबाजारातील धोकादायक इमारतीवर नगर परिषदेचा बुलडोझर

नावाची लपवाछपवी, दबाव आणि अर्थकारणाची चर्चा 

संगमनेर | प्रतिनिधी –

घासबाजार परिसरातील मोडकळीस आलेल्या आणि नागरिकांसह हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या एका धोकादायक खाजगी इमारतीवर अखेर संगमनेर नगर परिषदेने बुलडोझर चालवत ती भुईसपाट केली. वारंवार नोटिसा देऊनही संबंधित मालमत्ताधारकाने आवश्यक उपाययोजना न केल्याने मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

सदर इमारतीच्या परिसरात पद्मरसिक शाह विद्यामंदिर, आदर्श विद्यामंदिर आणि दिगंबर गणेश सराफ विद्यालय या शाळा असून, या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा असते. पावसाळ्यात इमारत कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत संभाव्य दुर्घटना टाळली.

नगर परिषदेचे पथक अवजड यंत्रसामग्रीसह घटनास्थळी दाखल झाले आणि कोणताही विलंब न लावता इमारत पाडण्याची कारवाई पूर्ण केली. यावेळी मुख्याधिकारी दयानंद गोरे, अभियंता महेश गोरडे, अभियंता पंकज मुंगसे तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कारवाईनंतर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, धोकादायक इमारतींबाबत नोटीस मिळालेल्या मालमत्ताधारकांनी स्वतःहून तातडीने कारवाई करावी. अन्यथा नगर परिषद अशा इमारती स्वतः पाडेल आणि त्यासाठीचा संपूर्ण खर्च संबंधित मालकाकडून कायदेशीर प्रक्रियेनुसार वसूल केला जाईल.

दरम्यान, नगरपालिकेने ३ जुलैला कारवाई केली. त्याची प्रेस नोट मात्र ६ जुलैला देण्यात आली. धोकादायक इमारत पाडतानाचे फोटो देखील देण्यात आले. मात्र नगरपालिकेच्या नोटिसांना भीक न घालणाऱ्या त्या घरमालकाचे नाव देण्याचे नगरपालिकेकडून टाळण्यात आले. नाव लपवण्यामागे दबाव आणि अर्थकरण असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!