धरणांमधून पाणी सोडताना प्रशासनाशी समन्वय राखा ; जलव्यवस्थापनात कोणतीही हलगर्जी नको : डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय आढावा; धरणांतील जलसाठ्यात मोठी वाढ, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश
शिर्डी | प्रतिनिधी
कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता धरणांचे व्यवस्थापन अत्यंत दक्षतेने करावे, असे निर्देश जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी दिले. धरणांमधून पाणी सोडताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांशी प्रभावी समन्वय राखणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत डॉ. विखे यांनी कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रातील पावसाची स्थिती, धरणांतील जलसाठा, संभाव्य पूरपरिस्थिती तसेच आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस पुणे व नाशिक विभागातील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, कार्यकारी संचालक आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कृष्णा व गोदावरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा जुलैच्या पहिल्या आठवड्यातील १२ टक्क्यांवरून ७ जुलैपर्यंत ३१ टक्क्यांवर पोहोचला असून अवघ्या पाच दिवसांत सुमारे ८०.८ टीएमसी पाण्याची भर पडली आहे.
खडकवासला धरण समूहात ७.५४ टीएमसी, पवना धरणात ४.८४ टीएमसी, भामा आसखेड धरणात ४.१५ टीएमसी, भाटघर धरणात ५.१६ टीएमसी, वीर धरणात २.०१ टीएमसी आणि नीरा देवघर धरणात २.६२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
नाशिक विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त जलसाठा २६ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भंडारदरा धरणात ४.७५ टीएमसी, निळवंडे धरणात १.७१ टीएमसी, दारणा धरणात १.५५ टीएमसी आणि गंगापूर धरणात २.१२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढला असून जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा २१.७६ टीएमसी इतका झाला आहे.
बैठकीत डॉ. विखे यांनी भारतीय हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग आणि हवामान पूर्वानुमान यंत्रणांकडून मिळणाऱ्या अंदाजांचा सातत्याने अभ्यास करून धरणांमध्ये होणारी आवक, जलसाठा, पाणी सोडण्याचे नियोजन आणि नदीपात्रातील प्रवाह यांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्याच्या सूचना दिल्या. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक धरणाचा आपत्कालीन कृती आराखडा अद्ययावत ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील नदीपात्र, कालवे आणि मुक्कामस्थळांवर आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध राहील, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वारकरी आणि स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून पालखी सोहळा सुरक्षित व सुरळीत पार पडेल याची दक्षता घेण्यावरही त्यांनी भर दिला.
मान्सून काळात धरणांची संरचनात्मक सुरक्षितता, यांत्रिक उपकरणे आणि विद्युत प्रणालींची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देत डॉ. विखे यांनी नदीकाठच्या नागरिकांना वेळेवर, अचूक आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांना केले.
