शेरणखेलमध्ये बेकायदेशीर गौणखनिज उत्खननाचा गंभीर आरोप

महसूल अधिकाऱ्यांसह सरपंचाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अकोले | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील शेरणखेल येथील गट क्रमांक ६१/१ मधील वडिलोपार्जित शेतजमिनीत बेकायदेशीरपणे भूसुरुंगाचा वापर करून दगड व खडीचे उत्खनन करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधित व्यक्तींसह तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार संतोष लक्ष्मण कासार यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, मुख्य सचिव, अहमदनगर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (संगमनेर) तसेच तहसीलदार (अकोले) यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित जमीन ही एकत्रित कुटुंबाच्या मालकीची असून तक्रारदाराच्या संमतीशिवाय तिचा वापर करण्यात आला. याच जमिनीत कोणतीही वैध परवानगी न घेता भूसुरुंगाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराने डिसेंबर २०२४ मध्ये घटनास्थळी भेट दिली असता उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे पाहिल्याचा दावा केला आहे. यावेळी संबंधितांकडे परवानगीची कागदपत्रे मागितली असता ती दाखविण्यात आली नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच घटनास्थळी काढलेली छायाचित्रे व व्हिडिओ पुरावा म्हणून जोडल्याचा दावा करण्यात आला आहे.

तक्रारीत महसूल विभागाच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात बेकायदेशीर उत्खनन झाले असतानाही अहवालात त्याचा उल्लेख टाळून क्षेत्रात केवळ शेततळ्यासारखा खड्डा असल्याचे नमूद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार केल्यानंतर उत्खननाची जागा माती टाकून बुजवून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय तहसीलदार कार्यालयाने पाठविलेले पत्र चार महिन्यांच्या विलंबाने तक्रारदारापर्यंत पोहोचविण्यात आल्याने संबंधितांना लाभ मिळावा, असा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदाराने संबंधितांवर फौजदारी व विभागीय कारवाई, शासनाच्या महसुलाची वसुली तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!