मालुंजे गोळीबार प्रकरण : 

‘त्या’ व्हायरल ऑडिओने खळबळ ! संगमनेरच्या गौण खनिजाच्या काळ्या साम्राज्याचा ‘बाप’ कोण ?

मुरूम उत्खननाच्या वर्चस्वाच्या वादातून एकमेकांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या…

संगमनेर प्रतिनिधी –

मालुंजे येथील गोळीबार प्रकरणानंतर आता सोशल मीडियावर एकच गदारोळ झाला आहे ! फिर्यादी आणि आरोपी यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स तुफान व्हायरल झाल्या असून, या क्लिप्सने संगमनेर तालुक्यातील गौण खनिजाच्या ‘काळ्या साम्राज्या’चे धिंडवडे काढले आहेत. जरी या ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी यातील कथित संवादामुळे तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत का ? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

‘माझं क्षेत्र… तुझं क्षेत्र !’ गुंडशाहीच्या भाषेने मर्यादा ओलांडल्या !

व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मुरूम उत्खननाच्या ठिकाणांवरून उफाळलेला जीवघेणा वाद स्पष्ट ऐकायला मिळत असल्याचा दावा केला जात आहे. “कोणत्या भागात कोणी काम करायचे?”, “एकमेकांच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे नाही!” अशा थेट टोळ्यांच्या (Gang War) भाषेत संवाद सुरू असून, दोन्ही बाजूंनी अत्यंत अश्लील शिवीगाळ करत एकमेकांना थेट ‘गेम’ करण्याच्या (जीवे मारण्याच्या) धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

मालुंजे, डिग्रस, अंभोरे परिसरात ‘माफिया राज’ ?

या कथित संभाषणावरून मालुंजे, डिग्रस, अंभोरे आणि आसपासच्या परिसरात गौण खनिज उत्खननावरून केवळ स्पर्धा नसून, वर्चस्वाचा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. कायदे धाब्यावर बसवून निसर्गाची लूट करणारे हे ‘खनिज माफिया’ नक्की कोणाच्या जीवावर एवढे उड्या मारत आहेत ? हा खरा प्रश्न आहे.

महसूल विभागाचे ‘कनेक्शन’ ? फॉरेन्सिक तपासणीची मागणी !

सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा म्हणजे, या कथित संभाषणात थेट महसूल विभागातील काही पदांचा उल्लेख जाहीरपणे ऐकू येत असल्याचे बोलले जात आहे. केवळ नावाचा उल्लेख झाला म्हणजे अधिकारी दोषी ठरत नाहीत, पण यामुळे संशयाची सुई नक्कीच फिरली आहे.

“या कथित ऑडिओची फॉरेन्सिक तपासणी केली तर, संभाषणातील आवाज नक्की कोणाचे आहेत हे समोर येईल मात्र एकमेकांना भयानक शिवीगाळ करताना एकमेकाची नावे स्पष्टपणे घेतलेली आहेत. 

मालुंजे येथील गोळीबार हा केवळ एक गुन्हा नाही, तर तो संगमनेर तालुक्यातील बेकायदेशीर उत्खनन, कोट्यवधींचे काळे आर्थिक हितसंबंध, पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि प्रशासनाचा सुस्तपणा या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे. आता पोलीस आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हायरल कथित ऑडिओची आणि बेकायदेशीर उत्खननाच्या संपूर्ण काळ्या धंद्याची ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करणारी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर या तपासात राजकीय किंवा प्रशासकीय दबावामुळे ‘अर्थपूर्ण’ तडजोड झाली, तर नागरिकांचा सर्वच व्यवस्थेवरील विश्वास उडेल. कोणत्याही गुन्हेगाराला किंवा पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशा चेहऱ्यांना आता सोडता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!