मालुंजे गोळीबार प्रकरण… 

गौण खनिज तस्करीच्या हमाम मध्ये सगळेच नंगे ! —

तस्करांना पाठीशी घालणारे ‘राजकीय’ धागेदोरे शोधण्याची मागणी…. 

डोंगर पोखरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?

संगमनेर | विशेष प्रतिनिधी –

तालुक्यातील मालुंजे येथे नुकत्याच घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण संगमनेर तालुका हादरला आहे. या गोळीबारामागे नेमके काय गौडबंगाल आहे, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाचा थेट संबंध तालुक्यात सुरू असलेल्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन, राजरोस तस्करी आणि काळ्या वाहतुकीशी असल्याचा दाट संशय आता स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. “गौण खनिज तस्करीच्या हमाममध्ये सगळेच नंगे” अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशी करून पडद्यामागील ‘मास्टरमाईंड’ समोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

डोंगर पोखरले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल !

मालुंजे, डिग्रस, आश्वी, अंभोरे, शिबलापूर आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा सुळसुळाट झाला आहे. काही ठिकाणी तर चक्क अख्खे डोंगरच्या डोंगर पोखरून मुरुमाची चोरी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मालुंजे येथील खंडोबा देवस्थान परिसरातील डोंगरातून शेकडो ब्रास मुरुमाचा अवैध उपसा झाल्याचे थेट व्हिडिओ चित्रीकरणातून उघड झाले आहे. या अवैध उद्योगाच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या व्हायरल झाल्या असून, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांदेखत ही ‘लूट’ कशी सुरू होती, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

दहशत, धमक्या आणि वर्चस्वाची लढाई !

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गौण खनिजांच्या या काळ्या बाजारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. या अवैध व्यवहारातून निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध, वर्चस्वाची स्पर्धा आणि परस्परांतील गँगवॉरमुळे परिसरातील वातावरण सातत्याने तणावपूर्ण बनत चालले आहे. शिवीगाळ, दमदाटी, उघड धमक्या आणि आता थेट गोळीबारापर्यंत पोहोचलेल्या या हिंसक कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

…तर तो केवळ दोन गटांतील वाद नाही !

मालुंजे येथे झालेला गोळीबार हा केवळ दोन गटांतील किरकोळ वाद होता की त्यामागे गौण खनिजांच्या अवैध व्यवहारांचे आणि कोट्यवधींच्या ‘कट-कमिशन’चे मोठे जाळे कार्यरत आहे ? याचा शोध तपास यंत्रणांनी घेणे गरजेचे आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय देणारे राजकीय वरदहस्त कोणाचे आहेत ? राजकीय किंवा अन्य प्रभावाचा वापर करून कारवायांच्या फाईल दाबणारे पांढरपेशी चेहरे कोण ? केवळ बंदूक चालवणाऱ्यांवर नव्हे, तर त्यांना रसद पुरवणाऱ्या आणि निसर्गाची लूट करायला लावून स्वतःची घरे भरणार्‍या त्या बड्या धेंड्यांचाही निष्पक्ष तपास झालाच पाहिजे.

सध्या या सर्व बाबींवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले, तरी “धूर निघतोय म्हणजेच आग लागली असणार” हे उघड आहे. आता चेंडू तपास यंत्रणांच्या कोर्टात आहे. पोलीस आणि संबंधित विभागाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती समोर आणावी. मालुंजे गोळीबार प्रकरण आणि गौण खनिजांची तस्करी यांमधील ‘क्राईम कनेक्शन’ काय आहे ? याचे उत्तर संगमनेरच्या जनतेला हवे आहे !

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!