संगमनेरला हवे निर्भीड नेतृत्व ; ‘झारीतील शुक्राचार्य आणि सत्ताधाऱ्यांशी छुपे हितसंबंध’ असणारे नको !

विशेष प्रतिनिधी —

संगमनेरच्या राजकारणात आता केवळ आरोप-प्रत्यारोपांचा खेळ नको ; प्रत्यक्ष काम, स्पष्ट भूमिका आणि जनतेसाठी सत्तेशी भिडण्याची हिंमत हवी, अशी भावना मतदारसंघात जोर धरू लागली आहे. शेतकरी, शेतमजूर, तरुण, व्यापारी, नोकरदार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व संगमनेरला मिळणार कधी ? हा सवाल आता अधिक तीव्रतेने पुढे येत आहे.

“आपल्या तालुक्याचे, मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी बाहेरच्या शक्तींच्या इशाऱ्याची वाट का पाहायची ?” असा रोकडा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असो, त्याची पहिली बांधिलकी जनतेशी असली पाहिजे. सत्ता कोणाचीही असो, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची आणि गरज पडल्यास स्वतःच्या सरकारलाही जाब विचारण्याची धमक नेतृत्वात असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या राजकीय शक्तींविषयी अनेकदा चर्चा होत आली आहे. निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या समीकरणांची जुळवाजुळव, पक्षांतर्गत कुरघोड्या आणि विकासाच्या निर्णयांवर राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे सामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण होत आहे.

संगमनेरच्या राजकारणाचा निर्णय संगमनेरच्या जनतेनेच घ्यायचा की पडद्यामागील राजकीय खेळाडूंनी ? हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे. जनतेला कोणाच्या वैयक्तिक राजकीय संघर्षात रस नाही. जनतेला रस्ते, पाणी, शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि मूलभूत सुविधांचा विकास हवा आहे. त्यामुळे विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या कोणत्याही राजकीय प्रवृत्तीला जनता जाब विचारणार, अशी भूमिका अधिक ठाम होताना दिसत आहे.

राजकारणात एक चेहरा जनतेसमोर आणि दुसरा सत्तेच्या दरबारात, अशी भूमिका चालणार नाही, अशी संतप्त भावना मतदारांमध्ये आहे. जनतेसमोर आक्रमक भाषणे करायची ; मात्र निर्णयाच्या वेळी तडजोडीचे राजकारण करायचे, या कथित दुटप्पी भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपली राजकीय दुकानदारी सांभाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी छुपे संगणमत करून सर्वसामान्य जनतेला किती दिवस भूलथापा मारणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

नेतृत्व म्हणजे केवळ भाषण नव्हे. नेतृत्व म्हणजे संकटाच्या वेळी जनतेच्या बाजूने उभे राहणे. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्याची तयारी नसेल, तर केवळ ‘निर्भीड’ असल्याचा दावा करण्याला अर्थ काय ? असा सवालही आता विचारला जात आहे.

संगमनेरला कोणाच्याही हातातील बाहुले नको. कोणाच्या कृपाछत्राखाली राजकारण करणारे नेतृत्व नको. मतदारांच्या मतावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा मतदारांचाच असला पाहिजे, अशी स्पष्ट अपेक्षा आता व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी उघड कोणाच्यातरी हातचे बाहुले आहेत. काही सत्ताधाऱ्यांचे छुपे बाहुले आहेत. पण बाहुले मात्र नक्की आहेत असेही बोलले जात आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी असोत, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असो, व्यापाऱ्यांच्या समस्या असोत किंवा ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा मुद्दा असो—प्रश्न कोणताही असला तरी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि गरज पडल्यास सरकारला धारेवर धरणारे नेतृत्वच संगमनेरला अपेक्षित आहे.

लोकशाहीमध्ये कोणताही नेता प्रश्नांपेक्षा मोठा नसतो. साहेब असो, पक्ष असो किंवा राजकीय दैवत—जनतेच्या हितापेक्षा कोणीही मोठे नाही. ग्रामपंचायत सदस्यांपासून सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि आमदार-खासदारांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या कामाचा हिशोब जनतेसमोर द्यावाच लागतो. स्वार्थासाठी पक्ष बदलणारे, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे असे लोकप्रतिनिधी देखील संगमनेर ने पाहिले आहेत. आजही पाहत आहेत. यांना धडा शिकवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आजवरच्या राजकारणात पक्ष, गट, व्यक्ती आणि नातेसंबंध यांना महत्त्व मिळाले असेल, मात्र पुढील काळात “काम केले का ?” नेत्यांच्या अंधभक्तीतून बाहेर येऊन हा एकच प्रश्न निर्भीडपणे विचारण्याचा दम प्रत्येक भक्तामध्ये, गुलामांमध्ये, लाभार्थ्यांमध्ये असायला हवा. तरच आपण राजकीय पुढार्‍यांचे, पक्षांचे समर्थक होतो आणि आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय केले हे आपल्याला छातीठोकपणे सांगता येईल. नाहीतर सोशल मीडियावर गप्पा आणि बोलबच्चन करणे असा अनेकांचा रोजचा दिनक्रम होऊन बसला आहे. त्याला समाजात ना कुठले स्थान आहे, ना मान्यता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!