उत्सवांची संधी साधून संगमनेरात अवैध धंद्यांचे ‘साम्राज्य’ पुन्हा बहरले !
मटका, जुगार, गांजा विक्रीचा धुमाकूळ ; अवैध धंद्यांवर पोलिसांची ‘मेहरबानी’ असल्याचा आरोप
संगमनेर प्रतिनिधी –
उत्सवांच्या मंगलमय वातावरणाचा गैरफायदा घेत संगमनेर शहरात मटका, जुगार आणि अन्य अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचा आरोप होत आहे. शहरातील नावाजलेल्या आणि हिस्ट्री शीटर ‘मटका किंग’ जुगार अड्डे चालक, अवैध दारू विक्रेते बारवाले, गांजा विक्रेत्यांकडून धंदे जोमाने सुरू करण्यात आले आहेत. मटका अड्डे, टपऱ्या पुन्हा बहरल्या असून, संबंधित अवैध धंद्यांवर पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीच्या काळात अवैध धंद्यांविरोधात कारवाईची अपेक्षा व्यक्त झाली होती. मात्र, आता ‘नव्याचे नऊ दिवस’ संपल्यानंतर शहरातील पारंपरिक अवैध धंदे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील विविध भागांत मटक्याचे जाळे !
दिल्ली नाका, तीन बत्ती चौक, नेहरू चौक, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, मालदाड रोड रोड, नाशिक रोड, माळीवाडा, जय भारत चौक, प्रवरा नदी म्हाळुंगी नदीच्या परिसरातील अनेक ठिकाणी छुप्या टपऱ्यांमधून हे उद्योग सुरू आहेत. तसेच उपनगरातील भाग, बायपासच्या पुलांच्या खाली देखील मटका चालवला जातो. जुगार अड्डे आणि मटक्यातली जहागीरदारी वाढली असल्याची माहिती पुढे येत आहे. हे सर्व करण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांशी संगणमत केले जात असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्ष टपऱ्यांबरोबरच मोबाईलच्या माध्यमातून ‘चलता-फिरता मटका’ चालविला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शहरासह तालुक्यातील इतरही पोलीस ठाण्याच् हद्दीत हाच प्रकार सुरू असून तेच पारंपारिक हिस्ट्रीशीटर मटका किंग, जुगार अड्डे चालक, अवैध दारू विक्रेते सक्रिय असल्याचे नागरिक सांगतात.
या ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध व्यवहारांची माहिती स्थानिक पातळीवरील यंत्रणांना नसते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर माहिती असेल तर कारवाई का होत नाही आणि माहिती नसेल तर पोलिसांची गुप्तवार्ता यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

‘डीबी’ पथकाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह
अवैध की वैध अशा कायदेशीर मुद्द्यात कायम अडकलेल्या पोलीस ठाण्यांमधील डीबी पथकाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध धंद्यांची माहिती गोळा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही नागरिकांकडून स्थानिक पोलिसांच्या तसेच कथित ‘डीबी’ पथकाच्या भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अवैध धंदे सुरू असताना संबंधित ठिकाणी नियमित कारवाई का होत नाही ? कारवाई होत असेल तर त्याचा तपशील काय? आणि तक्रारी प्राप्त होऊनही संबंधितांवर कठोर कारवाई होत नसेल तर त्यामागचे कारण काय, या प्रश्नांची उत्तरे पोलिस प्रशासनाने देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
ड्रग्ज प्रकरणांच्या पार्श्वभूमीवरही चिंता
संगमनेर शहर यापूर्वी मटका, जुगार, अवैध दारू वाहतूक, गुटखा विक्री तसेच गांजा व अमली पदार्थांच्या कथित व्यवहारांमुळे चर्चेत आले आहे. शहरातील वाढत्या ड्रग्जच्या प्रश्नाबाबत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सार्वजनिकरीत्या चिंता व्यक्त केली होती.
दुसरीकडे, आमदार अमोल खताळ पाटील यांनी संगमनेरात अवैध धंदे चालू देणार नसल्याची भूमिका यापूर्वी मांडली आहे. त्यामुळे आता शहरात मटका, जुगार, कत्तलखाने, ड्रग्स विक्री अन्य अवैध धंदे सुरू आहेत. ठोस कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. व्यसनमुक्त मतदार संघ असा आमदार खताळांचा नारा आहे अवैध धंदे आणि ड्रग्स गांजा तस्करी कधी बंद होईल याची अपेक्षा जनता करीत आहे.

मटक्यासोबतच काही ठिकाणी ‘बॉल गेम’ आणि अन्य प्रकारचे जुगार सुरू असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. या कथित व्यवहारांमुळे तरुण वर्गाला आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन अवैध धंदे वाढत असल्याचा आरोप होत असल्याने पोलिस प्रशासनाने या काळात विशेष दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा दावा केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेर शहरातील मटका, जुगार, गांजा, कत्तलखाने, जनावरांची वाहतूक अवैध दारू विक्री वाहतूक आणि अन्य अवैध धंद्यांची स्वतंत्रपणे माहिती घेऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील कोणत्या भागात कोणते अवैध धंदे सुरू आहेत, त्यांच्यामागे नेमके कोण आहेत, त्यांच्यावर यापूर्वी किती कारवाया झाल्या आणि पुन्हा तेच धंदे सुरू होण्यामागे कोणते कारण आहे, याची चौकशी झाल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
