‘सौ शहरी, एक संगमनेरी’ बाणा हरवतोय का ? 

अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्या चमच्यांचे ‘सुपारी’ राजकारण !

विशेष प्रतिनिधी –

“सौ शहरी, एक संगमनेरी !” स्वाभिमान, अन्यायविरोधी संघर्ष आणि लढवय्यी वृत्ती यांमुळे संगमनेरची ही ओळख अनेक दशके टिकून राहिली. मात्र, सध्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वातावरणात संगमनेरची हीच ऐतिहासिक ओळख हळूहळू लुप्त होत चालली आहे की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. संगमनेर काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या महामोर्च्याच्या निमित्ताने आणि ड्रग्स प्रकरणातील खोटे गुन्हे, तपासातले घोटाळे करणारे अधिकारी, शेतीचे पंचनामे टाळणारे महाभाग, आढावा, टंचाई बैठकींना गैरहजर असणारे मुजोर अधिकारी यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने चव्हाट्यावर आला आहे.

संगमनेरच्या जनतेने आणि राजकीय, सामाजिक, चळवळीतील नेत्यांनी (पूर्वीच्या) कधीही सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या, जनतेची कामे रखडवणाऱ्या किंवा उद्धट वर्तन करणाऱ्या पोलीस अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची ‘हाजी-हाजी’ केली नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अगदी कडक शब्दात आणि आंदोलनांच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून देणे, हा संगमनेरचा इतिहास आहे.

या संघर्षात अनेकदा निष्पाप कार्यकर्ते आणि तरुणांवर गुन्हे दाखल झाले, काहींना मारहाण झाली, तर काहींना तुरुंगातही जावे लागले. तरीही संगमनेरची जनता आणि आंदोलक पोलीस व प्रशासनाच्या मनमानीविरोधात कधी झुकले नाहीत. अनेक जुलमी अधिकाऱ्यांना आंदोलनांच्या ताकदीने वठणीवर आणल्याची उदाहरणे संगमनेरच्या इतिहासात नोंदवली गेली आहेत.

पोलीस प्रशासनाच्या दादागिरीचा आणि राजकारणाचा जबरदस्त परिणाम भोगणारे आणि विविध आंदोलनांमध्ये प्रचंड मारहाण सहन करणारे स्वर्गीय किसन सावजी, राधावल्लभ कासट, कुंदनसिंग परदेशी, विष्णू गीते, कुमार नाकील, राजेंद्र जोर्वेकर, डॉ. किशोर सराफ, अप्पा केसकर, तसेच रमेश काळे, वसंत गुंजाळ, विनायक नागरे, ज्ञानेश्वर कर्पे, गुलशन कालडा, राजेंद्र गुजर, कैलास गुजर, राजेंद्र सुरग, गोकुळ पवार, पंडित दुधे बंधू, सुभाष (गोट्या) शहा, चिमा काजळे, भाऊ यादव, अजित मणियार, राजाभाऊ अवसक, इसहाकखान पठाण, श्याम जाजू, एस. झेड. देशमुख….

ग्रामीण भागातून स्वर्गीय भाऊसाहेब थोरात, कारभारी मामा कडलग, कॉम्रेड गुलाब देशमुख, कॉम्रेड रामभाऊ नागरे, साथी सायन्ना एनगंदुल, ॲड. संभा देशमुख, ॲड. टी. जी. सोनवणे (भाई), कॉम्रेड सहाणे मास्तर, अशी संघर्ष करणारी आणि लढणारी उदाहरणे आहेत. यामध्ये आंदोलक महिलांचाही सहभाग आहे. (मात्र माझ्याकडे सर्वकष माहिती नसल्याने उल्लेख केलेला नाही, क्षमस्व..) काही बोरूबहाद्दरांनी त्यावेळी सुद्धा घरात बसून, काड्या करून या लढणाऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केलेले आहेच. (अनेक नावे राहून गेली असतील त्याबद्दल क्षमस्व..)

सध्या संगमनेरात अत्यंत लज्जास्पद आणि आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया सारखा प्लॅटफॉर्म वापरून आपण सोशल मीडियाचे किंग आहोत असा गैरसमज झालेली काही ‘भंपक’ मंडळी गरज नसतानाही अधिकाऱ्यांच्या बाजूने तोंड चालवणे, लेखण्या झिजवणे आणि ‘सुपाऱ्या’ घेऊन त्यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत आहेत. यामध्ये फक्त राजकीय प्रवृत्ती दिसत असून आपल्या विरोधाकाच्या विरोधात काहीतरी उद्योग करणे एवढाच धंदा सुरू आहे. मात्र त्याचे दूरगामी परिणाम आपल्या समाजावर, शहरावर आणि नागरिकांवर होतात याचे कुठलेही भान या ‘भिकारचोट’ मंडळींना नसल्याचे दिसते.

पूर्वी अधिकाऱ्यांवर काही आरोप झाले किंवा त्यांची भूमिका संशयास्पद वाटली, त्यांच्या प्रशासकीय चुका, कृपया राजकीय भूमिका चव्हाट्यावर आणल्या तर खुद्द अधिकारी पत्रकार परिषद घेऊन किंवा अधिकृत निवेदन काढून स्पष्टीकरण देत असत. आज मात्र ‘अधिकारी मूग गिळून गप्प’ बसतात. आणि अधिकाऱ्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी, त्यांचे पाप झाकण्यासाठी किंवा त्यांची गळचेपी लपवण्यासाठी ‘सुपारी’ घेतलेले भाडोत्री चमचे आणि हुजरे पुढे येत खुलासे करताना दिसतात.

भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची ही लाचारी आणि चमचेगिरी संगमनेरच्या वर्षानुवर्षांच्या ‘लढवय्या बाण्याला’ कायमचा डाग लावणारी ठरत आहे. मूठभर स्वार्थी लोकांमुळे संगमनेरच्या आंदोलनाचा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याच्या परंपरेचा अवमान होत आहे. ही हुजरेगिरी करणारे आणि सुपाऱ्या घेऊन सोशल मीडियावर ट्रेंड चालवणारे गुलाम संगमनेरच्या ऐतिहासिक अस्मितेला घातक ठरत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!