आश्वी-दाढमध्ये वाळू तस्करीचा धुमाकूळ ; पकडलेला हायवा पोलीस ठाण्यातून गायब !
महसूल व पोलिसांवर दबाव आणणारा साखर कारखान्याचा तो संचालक कोण ?
विशेष प्रतिनिधी —
राज्य शासनाने वाळू तस्करीविरोधात थेट फौजदारी कारवाईचे आदेश दिले असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू तस्करी सुरूच असल्याचे चित्र आहे. पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील आश्वी-दाढ परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी राहता तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून वाळू वाहतुकीची वाहने पकडली होती. या वाहनांमागे बड्या व्यक्तींचा संबंध असल्याची चर्चा असून, संबंधितांची पूर्ण ओळख तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, आश्वी-दाढ परिसरात वाळू तस्करी करताना एक हायवा पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे वाहन आश्वी पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते. मात्र, कोणतीही स्पष्ट दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई न होता हे वाहन पोलीस ठाण्यातून निघून गेल्याचा आरोप होत आहे.
कारखाना संचालकाच्या वाहनाची चर्चा
पकडलेले वाहन एका नामांकित साखर कारखान्याच्या संचालकाचे असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. वाहन सोडवण्यासाठी संबंधितांकडून रात्री प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणात राजकीय दबाव होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे पकडलेल्या वाहनाचे पोलीस ठाण्यातील छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. त्यामुळे वाहन नेमके कोणाच्या आदेशाने सोडण्यात आले आणि त्यावर कारवाई का झाली नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

‘वाळू माफियांचे कंबरडे मोडणार’ मग कारवाई कुठे ?
वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या घोषणा होत असताना पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच वाळू तस्करीचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पकडलेले वाहन पोलीस ठाण्यातून कारवाईविना बाहेर गेले असल्यास त्याची चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रकरणात पोलीस आणि महसूल विभागावर नेमका कोणाचा दबाव होता ? प्रशासन बड्या व्यक्तींवरही समान कायदा लागू करणार का ? याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
