गौण खनिजाच्या काळ्या साम्राज्याचा हिंसक चेहरा ! संगमनेरात गोळीबार !!

मुरूम – वाळू तस्करी रोखण्यात पोलीस व महसूल यंत्रणा अपयशी…

 

आता केवळ गोळीबारातील आरोपींवर कारवाई करून हा विषय संपणार नाही. या वादामागील संपूर्ण गौण खनिज साखळी, त्यातील आर्थिक व्यवहार, संबंधित जबाबदार घटक आणि संभाव्य संरक्षण यांचा निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. आणि घडणाऱ्या सर्वच प्रकारच्या हिंसक घटना मागील नेमके सत्य काय आहे हे देखील उघड व्हायला हवे.

 

विशेष प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे गौण खनिज मुरूमच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीतही मुरूमच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. गोळीबारासह तलवारीसारख्या शस्त्रांनी घराची तोडफोड करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना केवळ एका गावातील गुन्हा नसून, संगमनेर तालुक्यात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रश्नाने आता हिंसक स्वरूप धारण केल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. मुरूम, वाळू, दगड आणि मातीच्या अवैध व्यवहारांवर वेळेत प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका आता अधिक तीव्र झाली आहे.

गौण खनिजाच्या अवैध उत्खननावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि महसूल विभागाच्या भरारी पथकांकडून नियमित कारवाया, जप्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अपेक्षित असतात. मात्र, तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना ही साखळी खंडित का झाली नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी आपल्याच विभागातील बे जबाबदार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अशा घटनांसाठी कधीतरी जबाबदार धरणार आहेत की नाही, असाही सवाल उपस्थित झाला आहे.

मुरूम वाहतुकीच्या वादातून थेट गोळीबार केल्याचा उल्लेख फिर्यादीनेच केल्याने, हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. जर अवैध आर्थिक हितसंबंधांमधून असे हिंसक संघर्ष उभे राहत असतील, तर ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसून संपूर्ण प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. या घटनेचा दोन्ही बाजूने गांभीर्यपूर्वक तपास होण्याची गरज आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मालुंजे पंचक्रोशीसह तालुक्यात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.

आता केवळ गोळीबारातील आरोपींवर कारवाई करून हा विषय संपणार नाही. या वादामागील संपूर्ण गौण खनिज साखळी, त्यातील आर्थिक व्यवहार, संबंधित जबाबदार घटक आणि संभाव्य संरक्षण यांचा निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे.घडणाऱ्या सर्वच प्रकारच्या हिंसक घटना मागील नेमके सत्य काय आहे हे देखील उघड व्हायला हवे. नागरिकांचाही हाच प्रश्न आहे की, संगमनेरमध्ये अवैध गौण खनिज व्यवहारांवर निर्णायक आळा नेमका कधी बसणार ?

मालुंजेतील गोळीबाराने एक गोष्ट स्पष्ट केली आहे— संगमनेर तालुक्यातील गौण खनिजाचा प्रश्न आता फक्त महसुलाचा राहिलेला नाही, तो कायदा-सुव्यवस्था, पर्यावरण आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेशी थेट जोडला गेला आहे. आता जिल्हा प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या साखळीवर कठोर कारवाई केली नाही, तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री कोण देणार ?

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!