२१ ऑगस्टला राज्यभर ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ ; जलसंवर्धनाला मिळणार लोकचळवळीचे स्वरूप
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो’ (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) ही यंदाची थीम आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

जास्तीत जास्त ३ किलोमीटर वॉकेथॉन
२१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त ३ किलोमीटर अंतराची महा वॉकेथॉन आयोजित करण्यात येईल. त्यानंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे. जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन
राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, रनिंग व सायकलिंग क्लब, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार, क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स तसेच व्यायामशाळा आणि नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी
महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड आधारित ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजीच्या वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या सोशल मीडिया प्रचारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे २१ ऑगस्टच्या महा वॉकेथॉनमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
