लोकप्रतिनिधींच्या ‘मौना’वर उलटसुलट चर्चा ! —
मालुंजे गोळीबार प्रकरण : गौण खनिज, मुरूम अवैध उत्खनन..
संगमनेर तालुक्यात तस्करांचा उच्छाद, एरवी आक्रमक असणारे नेते या गंभीर घटनेवर शांत का ? जनतेतून सवाल
विशेष प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात गौण खनिज आणि मुरूम उत्खननाच्या अंतर्गत वादातून संदीप घुगे यांच्यावर झालेला कथित गोळीबार आणि तलवारीने झालेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. सुदैवाने या घटनेत घुगे यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या घराचे नुकसान झाले असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंभोरे गावातील ६ संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे हा संपूर्ण वाद गौण खनिज आणि मुरूम उत्खननाच्या आर्थिक वादातूनच उफाळला असल्याची प्राथमिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. परंतु, या संपूर्ण गंभीर प्रकारानंतर एरवी तालुक्यातल्या वाळू किंवा मुरूम उपशाच्या मुद्द्यांवरून कमालीचे आक्रमक होणारे राजकीय नेते, पुढारी आणि लोकप्रतिनिधी या घटनेवर सध्या शांत का आहेत ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून, त्यांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

पालकमंत्री विखे पाटलांच्या आक्रमक भूमिकेकडे जनतेचे लक्ष
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा संगमनेरमधील वाळू आणि गौण खनिज तस्करी संबंधाने जाहीर सभांमधून कडक भाषेत टीका केली आहे. तालुक्यात माफियागिरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राज्याचे महसूल मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. आताही ते जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने, त्यांच्याच कार्यकाळात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. या माफियागिरीवर अद्याप म्हणावी तशी ठोस आणि धडाकेबाज कारवाई का झाली नाही, असा सूर आता उमटत असून पालकमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार अमोल खताळ पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह !
आमदार होण्याआधी संगमनेर तालुक्यातील अवैध कामांविरोधात तक्रारी आणि आंदोलने करणारे आमदार अमोल खताळ पाटील यांनी मालुंजे प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. एवढेच नव्हे तर संगमनेर तालुक्यातील गौण खनिज तस्करीवर देखील ते सध्या मौन बाळगून असल्याचे बोलले जात आहे. आमदार झाल्यानंतर तालुक्यातील अशा बेकायदेशीर कृत्यांना चाप बसेल, अशी आशा मतदारांना होती. अगदी सुरुवातीला वाळू तस्करी करणाऱ्या गाड्या पकडल्याचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर मात्र, अद्यापही परिस्थिती जैसे थे असल्याने, ही व्यवस्था बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून ठोस प्रयत्न कधी होणार ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही टीका
दुसरीकडे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही जनतेमधून टीका केली जात आहे. गौण खनिज किंवा वाळू तस्करीच्या गंभीर मुद्द्यांवर खासदारांनी संसदेत किंवा स्थानिक पातळीवर कधीही ठोस आवाज उठवला नाही, असा आरोप केला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनावरील कथित दबावाचीही चर्चा !
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा आहे की, संगमनेर, अकोले आणि जिल्ह्यातील गौण खनिज तस्करांवर कडक कारवाई करताना स्थानिक प्रशासनावर आणि पोलिसांवर छुपे दबाव आणले जातात. पोलिसांचे हात बांधणारे हे अदृश्य हात नेमके कोणाचे आहेत ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचे कंबरडे मोडावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. मालुंजे गोळीबार प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून, तालुक्यातील संपूर्ण बेकायदेशीर गौण खनिज आणि मुरूम तस्करीची पाळेमुळे उखडून टाकावीत, हीच सामान्य जनतेची प्रमुख मागणी आहे.
