उत्तर अहिल्यानगरमध्ये १२१ रेकॉर्डवरील आरोपींवर विशेष मोहिम ; प्रत्येकी २ लाखांचे बंधपत्र

श्रीरामपूर | प्रतिनिधी – 

अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे आणि रेकॉर्डवरील आरोपींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथे शनिवारी (४ जुलै) आरोपींची ओळख परेड, प्रतिबंधक कारवाई विशेष मोहिम तसेच समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या आदेशानुसार उत्तर अहिल्यानगर विभागातील १७ पोलीस ठाण्यांतील एकूण १२१ रेकॉर्डवरील आरोपी या मोहिमेत हजर होते. यामध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच आर्म ॲक्टअंतर्गत गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश होता.

मोहिमेदरम्यान आरोपींकडून इंट्रॉगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. त्यामध्ये कुटुंबीयांची माहिती, व्यवसाय, सध्या करत असलेले काम, वापरात असलेले वाहन, मोबाईल क्रमांक आदी माहितीची नोंद करण्यात आली.

यानंतर भारतीय नागरिक संहिता कलम १२९ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्यासमोर प्रत्येक आरोपीकडून ₹२ लाखांचे बंधपत्र करून घेण्यात आले. पुढील दोन वर्षांत संबंधित आरोपीने पुन्हा गुन्हा केल्यास ही रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल, तसेच रक्कम न भरल्यास न्यायालयीन कोठडीची कारवाई होऊ शकते, अशी स्पष्ट समज आरोपींना देण्यात आली.

यावेळी आरोपींना पुन्हा गुन्हा केल्यास पूर्वीच्या गुन्ह्यांतील जामीन रद्द होऊ शकतो, तडीपार किंवा मोक्का सारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते, अशी सूचना करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ प्रसारित करू नयेत, गुन्हेगारांबाबत माहिती असल्यास ती गोपनीयपणे पोलिसांना द्यावी आणि पुढील सहा महिन्यांपर्यंत दर मंगळवारी सकाळी ११ वाजता अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथे हजेरी लावावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.

ही विशेष मोहिम पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर (श्रीरामपूर), कुणाल सोनवणे (संगमनेर), अमोल भारती (शिर्डी) आणि निरज राजगुरू (शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर अहिल्यानगर विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी राबविली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!