संगमनेरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक उभारणार : डॉ. सुधीर तांबे
संगमनेर | प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी संगमनेर शहरात त्यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून हे स्मारक साकारण्यात येणार असून त्यासाठी नगरपालिकेने जागाही निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही अभिवादन करण्यात आले.

डॉ. तांबे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दलित, शोषित, कष्टकरी व वंचित समाजाचा आवाज बुलंद केला. समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा विचार त्यांनी जनमानसात रुजवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. आज राज्यघटनेतील मूल्यांचे जतन करण्याची गरज असून समाजाने एकजूट ठेवून सामाजिक समतेसाठी काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याबरोबरच अण्णाभाऊ साठे यांचे आधुनिक स्मारकही उभारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात ज्ञानेश्वर राक्षे यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, तसेच समाजातील युवकांनी शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
प्रा. बाबा खरात यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व गीतांचे सादरीकरण केले. यावेळी प्रा. प्रदीप पाटील, नितीन अभंग, संतोष गायकवाड, संदीप आव्हाड, राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, सचिन शेलार, विजय आव्हाड, देवेंद्र साळवे, विकी साळवे, संजय जमधडे, व्ही. डी. सरकार, विकी पवार, मनीष राक्षे, बाबासाहेब साळवे, विश्वनाथ आल्हाट, दीपक खरात, डी. के. जाधव, संजय शिंदे, सोनू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान : बाळासाहेब थोरात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सशक्त लेखणीतून कष्टकरी, श्रमिक आणि वंचित समाजाच्या भावना प्रभावीपणे मांडल्या. फकीरासह ३५ कादंबऱ्या, सुमारे ३०० कथा आणि विविध साहित्यकृतींच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांचे साहित्य १४ भारतीय भाषांसह जर्मन, इंग्रजी, पोलिश, रशियन आदी परकीय भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांचे साहित्य आणि विचार आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
