गणपती घेऊन घरी जात असताना तरुणावर फायरिंग ; संशयित ताब्यात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
तरुणावर गावठी कट्ट्याने गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ओम दिपक भोंडे (वय २१, रा. आण्णापूर, ता. शिरूर, जि. पुणे, हल्ली बाबुरावनगर, शिरूर) याला स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर येथून ताब्यात घेतले.
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशांत संदिप वाबळे (वय २१, रा. म्हसे, ता. पारनेर) हे मित्रासह शिरूरहून गणपती घेऊन घरी जात असताना घोडनदी पुलाजवळ थांबले होते. त्यावेळी संबंधित व्यक्तींनी व्हेरना कार त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचे तसेच किशोर शिंदे याने गावठी कट्ट्याने वाबळे यांच्यावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १८९(२), १९०, १९१(२) आणि आर्म्स ॲक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ओम भोंडे याचा शोध घेतला. तो बाबुरावनगर, शिरूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या ओम भोंडे यास गुन्ह्याच्या तपासकामी बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
