संगमनेर बस स्थानक ते पुणे नाका रस्ता कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करा – मुस्लिम कार्यकर्त्यांची मागणी 

जड वाहतुकीला कायमस्वरूपी नियोजनाची गरज ; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

संगमनेर प्रतिनिधी –

संगमनेर शहरातील बस स्थानक ते तीनबत्ती चौक, तीनबत्ती चौक ते प्रवरा नदी पूल तसेच तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका या प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता रुंदीकरण करावे, तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून होणारी अवजड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (P.W.D.) संगमनेर येथील कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनावर उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन रशीद शेख, अजीज ओहरा, अरबाज अजीज शेख, मुफ्ती सलीम खान, आवेन शेख, राजू काठे आदींच्या सह्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, बस स्थानक ते तीनबत्ती चौक, तीनबत्ती चौक ते प्रवरा नदी पूल आणि तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका हा संगमनेर शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, कंटेनर आणि ट्रक यांची वाहतूक सुरू असते. त्यातच अरुंद रस्ता, अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंग यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.

या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कंटेनरच्या चाकाखाली एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत, ही केवळ अपघाती घटना नसून शहरातील वाहतूक व्यवस्थेतील गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधणारी घटना असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या मार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार अपघात होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अतिक्रमणे हटवून रस्ता रुंद करण्याची मागणी

बस स्थानक ते तीनबत्ती चौक, तीनबत्ती चौक ते प्रवरा नदी पूल आणि तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका हा संपूर्ण मार्ग अतिक्रमणमुक्त करून रस्ता रुंद करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, हातगाड्या, पार्किंग तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या कंटेनर, ट्रक व इतर जड वाहनांच्या वाहतुकीबाबत कायमस्वरूपी नियोजन करावे. यासाठी पर्यायी मार्ग, वेळेची मर्यादा किंवा आवश्यक त्या वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

1. बस स्थानक ते तीनबत्ती चौक, तीनबत्ती चौक ते प्रवरा नदी पूल व तीनबत्ती चौक ते दिल्ली नाका हा संपूर्ण मार्ग तातडीने अतिक्रमणमुक्त करावा.

2. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता रुंदीकरणाची कार्यवाही तातडीने सुरू करावी.

3. रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींवर दंडात्मक कारवाई करावी.

4. या मार्गावरील अवैध पार्किंग व रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी.

5. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या कंटेनर, ट्रक व इतर जड वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करावे.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

निवेदनावर तातडीने कार्यवाही करून अतिक्रमणे हटविणे व रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन मोठ्या जनआंदोलनाचे आयोजन, रास्ता रोको, धरणे आंदोलन, उपोषण तसेच प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!