भांडी संच व शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण : एजंटांना पैसे देऊ नका — आमदार अमोल खताळ
संगमनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत सुमारे २७ हजार बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हा आकडा ५० हजारांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
शहरातील मातोश्री लॉन्स येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बांधकाम कामगारांना भांडी संच तसेच त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी स्वप्निल जाधव, शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल घोरपडे, उपजिल्हाप्रमुख रणजीत ढेरंगे, तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, दादाभाऊ गुंजाळ, संतोष रोहम, काशिनाथ पावसे, सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, संगीता पुंड, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, शंकर वाळे, गोपीनाथ रुपवते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत कोणताही भेदभाव न करता पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणी पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ १०६४ या भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईनवर तक्रार करावी, तसेच आपल्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोणत्याही लाभार्थ्याला त्रास होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी कामगारांना एजंट किंवा दलालांच्या माध्यमातून अर्ज न करण्याचा सल्ला दिला.
एजंटांवर कठोर कारवाईचा इशारा
कार्यक्रमात बांधकाम विभागाचे अधिकारी स्वप्निल जाधव यांनी बांधकाम कामगारांच्या नावावर पैसे उकळणाऱ्या एजंटांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. श्रीरामपूर येथे एका एजंटला कामगारांकडून पैसे स्वीकारताना रंगेहात पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेरमध्येही अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यात आले असून, एजंट किंवा दलालांना पैसे देणाऱ्यांवर तसेच घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
