पुणे – नाशिक रेल्वे स्थगितीविरोधात संगमनेर पेटणार !

११ जुलैला बसस्थानकासमोर देवगाव ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण 

प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर | प्रतिनिधी

पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प स्थगित केल्याच्या निर्णयाविरोधात संगमनेर तालुक्यातील संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवार, ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर देवगाव ग्रामस्थांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीने केली आहे.

कृती समितीचे सदस्य रवींद्र लामखडे, शंकर पावसे आणि सागर कोल्हाळ यांनी सांगितले की, पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प हा संगमनेर तालुक्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि कृषी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. हजारो शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शविली होती. भाजीपाला, दूध आणि इतर कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद वाहतूक मिळणार होती. तसेच विद्यार्थी आणि नोकरदार वर्गालाही मोठा दिलासा मिळाला असता. मात्र, प्रकल्पाला स्थगिती देऊन शासनाने तालुक्याच्या विकासालाच ब्रेक लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

उपोषणादरम्यान तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात येणार असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनाही आंदोलनाला उपस्थित राहून जाहीर पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देवगाव ग्रामस्थांच्या वतीने होत असलेले हे आंदोलन केवळ एका गावापुरते मर्यादित नसून, संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या विकास, अस्मिता आणि भवितव्याशी निगडित लढा असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी, युवक, व्यापारी आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रशासनाने आणि शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण तालुका एकवटून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीने दिला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!