‘रेल्वे प्रकल्प द्या, नाहीतर आंदोलनाचा स्फोट अटळ !’ – देवगाव ग्रामस्थांचा सरकारला थेट इशारा

रास्ता रोको ते आमरण उपोषणाचा एल्गार

संगमनेर | प्रतिनिधी

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द अथवा स्थगित करण्यात आल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील देवगाव ग्रामस्थांचा संताप शनिवारी रस्त्यावर उतरला. संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थ, शेतकरी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी शासनाने तातडीने रेल्वे प्रकल्प पूर्ववत सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, हा केवळ संघर्षाचा प्रारंभ आहे. आता आंदोलनाची व्याप्ती संपूर्ण संगमनेर तालुक्यात वाढविण्यात येणार असून प्रत्येक गटातून साखळी आंदोलन उभारले जाईल. पुढील टप्प्यात चंदनापुरी गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. तरीही शासनाने निर्णय घेतला नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

आंदोलनाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख अमर कतारी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता ढगे, संगमनेर वकील संघ, राष्ट्रसेवा दलाचे राजाभाऊ अवसक, छात्र भारतीचे अनिकेत घुले तसेच विविध सामाजिक संघटनांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला.

आंदोलनाची सांगता झाल्यानंतर संगमनेर तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प तातडीने पूर्ववत सुरू करावा, संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी हा प्रकल्प मार्गी लावावा आणि शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

देवगाव ग्रामस्थ रेल्वे कृती समितीच्या वतीने रवींद्र लामखडे, शंकर पावसे, सागर कोल्हाळ, मधुसूदन शिंदे, कोमल म्हस्के, शिबा गायकवाड, उपसरपंच सुनील शिंदे, दिनेश बांगर, संजय देशमुख, प्रमोद शिंदे, प्रकाश कोटकर, तुषार पानसरे, अमोल देशमुख, संतोष शिंदे, राहुल लामखडे, ज्योती लामखडे, किरण देशमुख, गणपत लामखडे आणि अविनाश देशमुख यांनी आंदोलनाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

समितीने शेवटी स्पष्ट इशारा दिला की, शासनाने जनभावनांचा आदर करून रेल्वे प्रकल्पाबाबत तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!