“संगमनेर महाविद्यालयाच्या मैदानावर फिरायलाही आता ‘टोल’ ?”
१५०० रुपये प्रवेश शुल्काविरोधात नागरिकांचा संताप ; निर्णय मागे न घेतल्यास जनआंदोलनाचा इशारा
संगमनेर टाइम्स | प्रतिनिधी
संगमनेर महाविद्यालयाच्या मैदानावर नागरिकांना फिरण्यासाठी ओळखपत्राच्या नावाखाली १,५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला भगिनी आक्रमक झाले आहेत. या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत त्यांनी शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेरच्या चेअरमन व सचिव यांना निवेदन सादर करून शुल्क आकारणीचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालय प्रशासनाने नागरिक नोंदणी व ओळखपत्रासाठी अर्ज मागवून त्यासाठी १,५०० रुपये शुल्क निश्चित केले आहे. हा निर्णय अन्यायकारक असून तो निरोगी समाजव्यवस्था, व्यायाम संस्कृती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संगमनेर-अकोले परिसरातील गोरगरीब, कष्टकरी, विडी कामगार, मजूर आणि शेतकरी यांच्या योगदानातून महाविद्यालय उभे राहिल्याने हे महाविद्यालय संपूर्ण जनतेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविद्यालयाशी आपले आत्मीय आणि भावनिक नाते असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून शेकडो ज्येष्ठ नागरिक या मैदानावर नियमितपणे चालण्यासाठी, व्यायाम आणि प्राणायामासाठी येत असून आजपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा शिस्तभंग केला नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. उलट नागरिकांच्या उपस्थितीमुळे परिसर अधिक सुरक्षित आणि उत्साही राहिल्याचा दावाही करण्यात आला आहे.
महाविद्यालय प्रशासनाने हा निर्णय त्वरित मागे घेऊन ज्येष्ठ नागरिकांचा मान राखावा. अन्यथा या अन्यायकारक निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
