अन्न सुरक्षा नियमांचा भंग ; दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ निलंबित !
अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाची कडक कारवाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अन्न सुरक्षा व मानके कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील ‘साई जतिन दूध संकलन केंद्राचा’ परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ. अ. भोईटे यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. यावेळी संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी तसेच आस्थापनेने सादर केलेल्या नाकारलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करून ही कारवाई करण्यात आली.

तपासणीत आढळलेल्या बाबींमुळे संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार संबंधित परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळीचा संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी केले आहे.
