दरोडा व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी साथीदारासह जेरबंद ; अकोल्यातील दरोड्यासह १० गुन्हे उघड

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क

स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा, जबरी चोरी, घरफोडी तसेच मोक्का कायद्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करून अकोले तालुक्यातील दरोड्यासह एकूण १० गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत मुख्य आरोपी अजय सादीश काळे याच्यासह अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले याला ताब्यात घेण्यात आले असून, या गुन्ह्यातील अन्य सात आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ रोजी पहाटे अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे अशोक केरू वाळुंज यांच्या घरात चार अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. १४ जुलै रोजी मुख्य आरोपी अजय काळे हा वाळकी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अजय सादीश काळे (वय २४, रा. वाळुंज) व अक्षय उर्फ सोन्या अर्पण भोसले (वय २६, रा. घानेगाव, ता. पारनेर) यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोघांनी अकोलेतील दरोड्यासह हा गुन्हा इतर सात साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने किरण भाऊसाहेब बेंद्रे याला विकल्याची माहितीही मुख्य आरोपीने पोलिसांना दिली. या प्रकरणातील गणेश भोसले, तुकाराम भोसले, बाळू भोसले, आशिष भोसले, शरद काळे, निकेश काळे, धिरज काळे तसेच किरण बेंद्रे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

तपासादरम्यान अजय काळे हा दरोडा, जबरी चोरी, घरफोडी तसेच मोक्का कायद्यासह एकूण ११ गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे निष्पन्न झाले. तर अक्षय उर्फ सोन्या भोसले याच्याविरुद्धही दरोडा, घरफोडी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दोन्ही आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर अकोले, पारनेर, राहाता, लोणी, घारगाव, आश्वी आणि अहिल्यानगर तालुका परिसरातील एकूण १० गुन्ह्यांची उकल केली आहे.

दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अकोले पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!