कोतुळमध्ये गुटखा व तंबाखू साठा जप्त ; स्विफ्ट कारसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका आरोपीवर अकोले पोलिसांनी कारवाई करत सुमारे ६ लाख ११ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा, पान मसाला, तंबाखूचा साठा तसेच एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.२५ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोतुळ येथील शोएब शाबीद काझी याने आपल्या घराजवळ उभी असलेल्या स्विफ्ट कार (एमएच ०२ बीडी ७५९९) मध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिस पथकाने पंचांसमक्ष छापा टाकून तपासणी केली असता वाहनामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. यामध्ये तुलसी रॉयल जाफरानी जर्दा, रजनीगंधा फ्लेवर्ड पान मसाला, विमल पान मसाला, V-1 बिग टोबॅको तसेच प्रीमियम RMD पान मसाला यांचा समावेश आहे.
या कारवाईत प्रतिबंधित अन्नपदार्थांसह ३ लाख रुपयांची स्विफ्ट कार असा एकूण ६,११,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी शोएब शाबीद काझी याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय मेंगाळ, अनिल कडलग, बापूसाहेब हांडे, राहुल सारवंदे व सुनील ढाकणे यांच्या पथकाने केली.
