अंमली पदार्थ एमडी तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी पकडले ; मुख्य पुरवठादार पसार 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू ठेवत सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली. श्रीरामपूर शहरात एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात जेरबंद केले. या कारवाईत २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अंमली पदार्थाचा कथित पुरवठादार अद्याप फरार आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या साखळीवर घाव घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत होते.

पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सोहेल जुबेर शेख (वय २७, रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) हा श्रीरामपूर–संगमनेर मार्गावरील नांदूर शिवारातील अस्तगाव फाटा परिसरात एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार होता. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. संशयित मोपेडवर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ४.८३ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपीने हा अंमली पदार्थ असीफ मुनीर शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. संबंधित आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ९६,६०० रुपयांचा एमडी अंमली पदार्थ, ६,२०० रुपये रोख रक्कम, ५० हजार रुपयांचा मोबाईल आणि १ लाख रुपयांची मोपेड, असा एकूण २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९८/२०२६ नोंदविण्यात आला असून एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २१(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या सलग कारवायांमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून, या साखळीतील इतर आरोपींवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!