सलग कारवाईचा धडाका !
अवैध दारूधंद्यांवर एलसीबीचे छापे ; ४ गुन्हे दाखल, 4 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत श्रीरामपूर शहर, मिरजगाव आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापे टाकले. या कारवाईत ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४ लाख ५९ हजार ८३० किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात ५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यापैकी एक आरोपी फरार आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्द : नितीन सुरेश शिंदे (रा. पुणतांबा, ता. राहाता) याच्यासह शिवाजी चौकातील महाराष्ट्र वाईन्स विरोधात कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ₹४,३५,३०० किमतीची देशी-विदेशी दारू व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाईन्सचा संबंधित आरोपी फरार आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्द : आकाश आजिनाथ रासकर (रा. चौधरीनगर, सोलापूर रोड, अहिल्यानगर) याच्याकडून ₹३,३७० किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली.
मिरजगाव पोलीस ठाणे हद्द : गणेश रमेश टकले (रा. गुरवपिंपरी, ता. कर्जत) याच्याकडून ₹६,९८५ किमतीची दारू जप्त करण्यात आली.
मिरजगाव पोलीस ठाणे हद्द : ऋषिकेश संजय मुळे (रा. मुळेवाडी, ता. कर्जत) याच्याकडून ₹१४,१७५ किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली.
या चारही कारवायांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई यशस्वीपणे पार पाडली. अवैध धंद्यांविरोधातील अशी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
