अहिल्यानगर मनपातील ‘लेआउट’ मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह ; १० टक्के आरक्षित जागेच्या नियमाचे उल्लंघन !
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी चव्हाट्यावर आणले प्रकरण
चौकशी समिती नियुक्त
अहिल्यानगर | प्रतिनिधी –
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात लेआउट मंजुरी प्रक्रियेत १० टक्के खुली अथवा आरक्षित जागा राखून ठेवण्याच्या नियमांचे पालन झाले का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात झालेल्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या नगररचना संचालकांनी नाशिक विभागाचे सहसंचालक आ. दि. बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.
नगर विकास विभागाच्या २९ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार, २०२० नंतर ४० आरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडांच्या विभाजनामध्ये एकूण क्षेत्राच्या १० टक्के जागा खुली किंवा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आरोप केला आहे की, या नियमाचे उल्लंघन करून काही लेआउटना मंजुरी देण्यात आली आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या हक्काच्या जागांचे तसेच शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान झाले.

तक्रारीनुसार, तत्कालीन आयुक्त पंकज जावळे आणि तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना राम चारठाणकर यांच्या कार्यकाळात काही तात्पुरत्या रेखांकनांना मंजुरी देण्यात आली. तसेच अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर विद्यमान आयुक्त यशवंत डांगे आणि नगररचनाकार वैभव जोशी यांनी आवश्यक अटींची पुरेशी पडताळणी न करता मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची अधिकृत चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जाणार आहे.
तक्रारीची प्राथमिक दखल घेत नगररचना संचालक कार्यालयाने ७ मे २०२६ रोजी विशेष आदेश काढून चौकशी समिती गठीत केली आहे. समितीमध्ये सहसंचालक वि. ल. वाघमोडे (संगणीकृत नियोजन कक्ष, पुणे) आणि सहाय्यक संचालक दिपाली म. पाटील (नाशिक विभाग) यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

ही समिती २०२० नंतर मंजूर झालेल्या संशयास्पद लेआउट फायली, भूखंड विभाजन प्रकरणे आणि बांधकाम परवानग्यांची सखोल तपासणी करणार आहे. चौकशी अहवालानंतर संबंधितांवर प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
तक्रारदार शाकीर शेख यांनी या प्रकरणातील सर्व मंजुऱ्यांची सखोल चौकशी करून नियमबाह्य मंजुऱ्या रद्द कराव्यात तसेच दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

